कोकणी बाणा – सतीश पाटणकर
कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. कोकणातील गणेशोत्सवाला धार्मिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत. कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. आपल्या घरात यंदा येणारी गणपतीची मूर्ती कशी असावी? यावर खल केला जातो. कॅलेंडरवरची उत्तम चित्रे अगदी जपून ठेवलेली असतात आणि यावेळी गणपतीच्या शाळेत अशी हुबेहूब मूर्ती बनवायला सांगायची, असा गुप्त बेत घरची वरिष्ठ मंडळी आखतात, तेव्हाच पोरासोरांना येणाऱ्या गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. डोंगर-कपारीत वसलेली टुमदार कौलारू घरे, त्याभोवती दूरपर्यंत दिसणारी हिरवीगार भातशेती, परड्यातल्या मांडवावरून डोकावणारे दोडके, पडवळ, तवशी; कौलावर दाट वेलामधूनही लक्ष वेधणारे भोपळे, घराघरांत ऐकू येणारे आरती-भजनाचे सूर, धूप-कापूर-अगरबत्तीचा मनमोहक सुगंध, असे एकूणच सर्वसमान दृश्य आता गणेशोत्सवाच्या दिवसांत कोकणातल्या प्रत्येक वाडीत नजरेस पडेल. या सणाची चाहूल लागताच कोकणवासीय त्याच्या तयारीत नकळत गुंतत जातात. घराची झाडलोट, भिंतींना रंग किंवा लाल मातीचा गिलावा, घरातील जमिनी शेणाने सारवून त्यावर चुन्याच्या पाण्याने रंगरंगोटी हे सर्वकाही सवयीने होत असते. दुसऱ्या बाजूला इकडे मुंबईकरांची तयारीही सुरू असते. त्यासाठी मग लालबाग, दादर, क्रॉफर्ट मार्केट, लोहार चाळीत गर्दी होऊ लागते.
बाप्पाच्या आगमनाच्या एक-दोन दिवस आधी कोकणचे मुंबईकर गावची वाट धरतात. या आराध्य दैवताचा कोकणातला रुबाबच काही और असतो. आता कोकणी माणूस पूर्वीसारखा चाकरमान्यांवर अवलंबून नसला, तरी फार पूर्वीपासून चाकरमानी आणि गावचा त्याचा परिवार गणपतीसाठी काय वाट्टेल ते, अशाच मन:स्थितीत असायचा. कोकणातली गणेश चतुर्थी हा आबालवृद्धांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. हा उत्सव ही सांगण्या-ऐकण्याची नव्हे, तर अनुभवण्याची गोष्ट आहे. कोकण रेल्वे आणि परिवहन महामंडळाच्या गाड्या अव्याहत धावत असल्या तरी काहीवेळा दरडी कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. असा सगळा व्याप झाला तरी त्याचा उत्साह काही कमी झालेला नसतो.
घरोघरी गणपतीच्या मूर्ती आलेल्या असतात. मुलाबाळांचा जल्लोश सुरू असतो. उद्यापासून ‘भजनाक जावक व्हया’म्हणून काही लोक पेटी, तबला, मृदंग, टाळ, झांज यांची जुळवाजुळव करीत असतात. यावर्षी कुणाकडे किती दिवस गणपती राहणार याचा अंदाज देवळात जमलेली मंडळी घेतात. इथे पेटी वाजवणारा आणि ती उचलून घरोघरी नेणारा यांची विशेष खबर काढली जाते. तबल्यावरची शाई या वर्षीही तशीच उडालेली आहे म्हणून कटाक्ष टाकले जातात. कोकणात प्रत्येक वाडीवर भजनी मंडळ असते. गण, स्तवन, अभंग, गवळण, कव्वाली, भारुड आणि शेवटचा गजर असे भजनाचे रूपडे असते. गावकऱ्यांच्या सोबतीने आणि टाळ-मृदंगाच्या साथीने भजन भक्ती ही कोकणची खासियत.
भल्या पहाटे उठून आंघोळ करून फुलं, तुळशी, दुर्वा काढल्या जातात. सगळीकडे अमाप उत्साहाचे वातावरण असते.
गणपतीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठापना केली जाते. पूजा आटोपल्यावर सजावटीकडे विशेष लक्ष पुरवले जाते. उकडीच्या मोदकांचा आणि सुग्रास भोजनाचा सुगंध घराघरांतून येत असतो. घरोघरी गणरायाला षोडशोपचारे पूजले जाते. विजेच्या तोरणांची आरास मांडली जाते. सत्यनारायणाची महापूजा केली जाते. पाहुणे, मित्र-मंडळी यांची सतत ये-जा सुरू असते. याच दिवसांत करंज्या, मोदक, पंचखाद्य, लाडू असे फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. अगदी सगळ्या घरात हमखास गोडाधोडाचे पदार्थ बनवण्याचे वर्षांतले हेच दिवस असतात. भजनाला येणाऱ्या मंडळींसाठी खास उसळीचा बेत आखला जातो. अनेक रूढी आणि परंपरा यांचे पालन करण्यात कोकणातला देवभोळा माणूस चुकत नाही. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये हे माहीत असले तरी चुकून वर नजर गेली आणि चंद्र दृष्टीस पडलाच, तर मात्र तो बैचेन होतो. मग कुणाच्या तरी परड्यातली भाजी गुपचूप तोडून तो त्या दोषाचे परिमार्जन करू पाहतो. गणेशोत्सवाच्या दिवसांत कोकणात मंगलमय वातावरण असते. जगात अनेक उत्सव साजरे केले जातात, पण कोकणात साजरा होणारा हा उत्सव अगदी आगळा-वेगळा असाच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याला बराच काळ होऊन गेला, असे असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने या उत्सवाकडे म्हणावे तसे लक्ष पुरवले गेले नाही. पर्यटनाच्या दृष्टीने या सणाचा विचार केल्यास या उत्सवाला जागतिक महत्त्व प्राप्त होऊ शकते.
पंचमी दिवशी दीड दिवसांचे गणपती जातात. त्याच दिवशी ऋषिपंचमी साजरी केली जाते. अळू, कंदमुळे आदी पाच भाज्यांची चविष्ट भाजी त्या दिवशी बनवली जाते. उंदरबी असल्याने उंदराला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवसात गौरींचे आगमन होते. गौरी पूजन आणि विसर्जनाचा सोहळा यथासांग पार पाडला जातो. काही गणपतींचे विसर्जन गौरीसोबतच केले जाते. अनंत चतुर्दशी दिवशी सर्वच गणपतींचे विसर्जन होते. विसर्जनाच्यावेळी आरती केल्यावर गणपतीला गाऱ्हाणे घातले जाते. त्यानंतर एका माणसाने गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन जाण्याएवढे त्या मूर्तीचे वजन असते. वाजत-गाजत गणपतीची मिरवणूक काढली जाते. गावातल्या तलावाजवळ किंवा विहीर, ओढ्याजवळ वाडीतले गणपती विसर्जनासाठी एकत्र आणले जातात. अनेक देखण्या गणेश मूर्ती, धूप, अगरबत्तीचा घमघमाट, संधिप्रकाशातला उजेड, निरांजनांचा मूर्ती उजळून टाकणारा प्रकाश आणि भावनांचा कल्लोळ अशा वेगळ्याच वातावरणात पुन्हा एकदा मनोभावे आरती केली जाते. पंचखाद्य, नारळ, फळे यांनी युक्त असा प्रसाद वाटला जातो. खूप जड अंत:करणाने गणरायाला निरोप दिला जातो. पण ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ म्हणणारा चाकरमानी पुन्हा एकदा गावाला राम राम करून मुंबईकडे वळतो तो वर्षभराची ऊर्जा घेऊनच.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)