नवी दिल्ली: जगभरात आता करोनानंतर मंकीपॉक्स या आजाराने थैमान घातला आहे. आता सगळीकडे ‘मंकीपाॅक्स’ (Monkeypox) चा प्रसार वेगाने होत आहे. मंकीपॉक्स हा एक झुनोसिस आजार आहे. याचा अर्थ असा की, मंकीपॉक्स हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. सामान्यतः या आजाराची लक्षणे कमी आहेत. आतापर्यंत उंदीर, डॉर्मिस, खार, माकडांच्या विविध प्रजाती आणि प्राण्यांमधून हा आजार मानवांमध्ये वेगाने पसरत आहे. प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला थेट मंकीपॉक्सची लागण होण्याची शक्यता अधिक आहे, यामुळे आता या आजाराबाबत भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत, ते जाणून घेऊयात.
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलं आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्सचे २०,००० रुग्ण आढळून आले आहेत. यात आफ्रिका, पाकिस्तान, आणि बांगलादेशमध्ये मंकीपॉक्सचे जास्त प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आणि सीमेवर विशेषत: पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या सीमांवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देश जारी केले आहेत.
मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?
मंकीपॉक्सबाधित रुग्णांमध्ये डोकेदुखी, ताप, स्नायूदुखी आणि पुरळ उठणे अशी लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे सहसा जीवघेणी नसली तरी काही प्रकरणांमध्ये ते गंभीर असू शकते. सुरुवातीला या लक्षणांमध्ये शरीरावर पुरळ उठण्यास सुरुवात होते. चेहऱ्यापासून पुरळ उठण्याची सुरुवात होते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरायला सुरुवात होते. यामुळे जखमा जास्त प्रमाणात होऊ शकतात. जखमेवर पू झाल्यानंतर जखम वाढून त्यात खड्डा पडतो.
मंकीपॉक्स कसा पसरतो?
शारीरिक द्रव, रक्त, किंवा संक्रमित प्राण्यांच्या त्वचेच्या किंवा श्लेष्मल जखमांच्या थेट संपर्कात आल्यास हा विषाणू प्राण्यांमधून थेट मानवामध्ये पसरू शकतो. याच्याव्यतिरिक्त एकापेक्षा अधिक पार्टनरशी लैंगिक संबंध ठेवल्याने श्वसनसंस्था, डोळे, नाक किंवा तोंडातून शरीरात मंकीपॉक्स प्रवेश करतो. याशिवाय संक्रमित व्यक्तीने वापरलेला बिछाना, कपडे किंवा टॉवेल यांसारख्या वस्तूंना स्पर्श केल्यानेसुद्धा मंकीपॉक्सची लागण होण्याची शक्यता जास्त असते.
मंकीपॉक्स हा विषाणू गंभीर आहे का?
मंकीपॉक्स हा आजार सामान्यत: सौम्य आहे, जो विशिष्ट उपचारांनंतर बरा होता. मात्र, काही प्रकरणांमध्ये त्याचे गंभीर रूप दिसू शकते. यातही लहान मुले, रोगप्रतिकारकशक्ती कमी, आणि गर्भवती महिला असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचे संक्रमण वेगाने होण्याची शक्यता असते.
प्रथम प्रयोगशाळेतील माकडांमध्ये हा विषाणू १९५८ मध्ये आढळून आला, म्हणून त्याला “मंकीपॉक्स” असे नाव देण्यात आलं.