Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडी'मंकी पॉक्स'ला आळा घालण्यासाठी प्रतिबंध सर्वेक्षण मोहीम!

‘मंकी पॉक्स’ला आळा घालण्यासाठी प्रतिबंध सर्वेक्षण मोहीम!

हिंगोली : सध्या विविध देशात मंकी पॉक्स या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांनी संसर्गाचा वेग व तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने वेळीच प्रतिबंध सर्वेक्षण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागांना दिल्या आहेत.

जगात आजघडीला मंकी पॉक्सचा संसर्ग वाढला आहे. देशात तो संसर्ग वाढू नये म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देत त्याची अंमलबजावणी तात्काळ जिल्हास्तरावर करण्यासाठी आरोग्य विभाग दक्ष आहे. त्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंध सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असून या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृतीसह विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

मंकी पॉक्स म्हणजे काय?

मंकी पॉक्स हा आजार ऑर्थोपॉक्स आर या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारचे खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. साधारणत: अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी एक ते दोन दिवसांपासून ते त्वचेवरील फोडावरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तीसाठी संसर्गजन्य असतो. जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे मंकी पॉक्स होऊ शकतो.

काय आहेत लक्षणे?

मागील तीन आठवड्यात मंकी पॉक्स बाधित देशांमध्ये प्रवास करून राज्यात आलेल्या व्यक्तीच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे आणि सुजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा अशी लक्षणे दिसून येतात.

अशी घ्या काळजी

मंकी पॉक्स टाळण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. मंकी पॉक्स प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. निकट सहवासितांचा शोध घेणे व आढळल्यास त्याची योग्य प्रकारे निगा राखणे, संशयित मंकी पॉक्स रुग्णास वेळीच विलगीकरण करणे. रुग्णांच्या कपड्यांची अथवा अंथरुणा पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे, आरोग्य संस्थेमध्ये मंकी पॉक्स रुग्णाशी उपचार करताना पीपीई किट्सचा वापर करणे, निकट सहवासीतामध्ये २१ दिवस पाठपुरावा करून रुग्णास ताप आल्यास प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -