मुंबई : दोन दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात एका सुटकेस (Dadar Suitcase Murder Case) मध्ये मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुकबधिर आरोपी जय चावडा आणि शिवजित सिंग यांना अटक केली होती. हे दोघेही मूकबधिर असल्याने पोलिसांना त्यांची भाषा जाणणाऱ्या तज्ज्ञांची मदत घेऊन दोघांची चौकशी करावी लागत आहे. चौकशीतून या दोन्ही आरोपींनी पैशांच्या वादातून मृत अर्शद शेखची हत्या केल्याची कबुली दिली. परंतु पोलिसांना त्यांचे म्हणणे पटत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरु केली. या चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील कलिना परिसरात राहणारा अर्शद शेख विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याची पत्नीही मूकबधिर आहे. मृत अर्शदची पत्नी रूक्सानाचा देखील या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले. इतकेच नव्हे तर या हत्याकांडातील आरोपी जय चावडासोबत रुक्सानाचे विवाहबाह्यसंबंध होते. त्यामुळेच जय चावडा आणि रुक्साना यांनी पूर्वनियोजित कट रचून अर्शद शेखची हत्या केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, जय चावडा आणि शिवजित सिंग हे दोघेही सुरुवातीला हत्येचा आळ एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तपासादरम्यान पोलिसांनी रुक्सानाचा मोबाईल तपासला. तेव्हा तिने तिच्या मोबाईलवरील सर्व व्हॉट्सअप हिस्टरी डिलिट केल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. याप्रकरणी पोलिसांनी रुक्सानाला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरु केली आहे.