तब्बल १५ तासांहून अधिक काळ अडकून पडले होते मासेमार
नाशिक : मुंबईत पाऊस काही काळाने विश्रांती घेत असला तरी राज्यभरात पावसाचे थैमान सुरुच आहे. नाशिक जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणांच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे. त्यातच मालेगाव (Malegaon) येथील गिरणा नदीला (Girna River) देखील पूर आला आहे. या नदीवर काल मासेमारी करण्यासाठी गेलेले १२ मासेमार काल पुराच्या पाण्यात अडकले. या सर्वजणांनी उंच खडकाचा आधार घेतल्यामुळे ते सुखरुप राहिले. एक रात्र त्यांनी या खडकावरच काढली. ते अडकून तब्बल १५ तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर अखेर आता त्यांना हेलिकॉप्टरद्वारे (Helicopter) पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.
नाशिकच्या सात धरणांमधून सध्या विसर्ग सुरु असल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्यातच काल गिरणा नदीच्या पाण्यात मासे पकडायला गेलेले १२ जण अडकल्याची घटना घडली. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या १२ जणांना तब्बल १५ तासांहून अधिक कालावधी उलटूनही नदीपात्रातून बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेर त्यांची लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे सुखरुप सुटका करण्यात आली. मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ (SDRF) जवान, तसेच स्थानिक नागरिक या सर्वांनीच या बचावकार्यात शर्थीचे प्रयत्न केले.
दरम्यान, या तरुणांना वाचविण्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची टीम रात्री घटनास्थळी दाखल झाली. मात्र रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबविण्यात आले होते. सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावर बसून राहिल्यामुळे सुखरूप होते.
नाशिकच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद (Maulana Mufti Mohammad) हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अडकलेल्या तरुणांना जेवण देखील पोहचवण्यात आले होते. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेवून २१ जणांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली होती. अखेर आता त्यांची सुटका झाली आहे.