Wednesday, March 26, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यटॉक्सिक म्हणजेच विषारी व्यक्तिमत्त्व कसे ओळखावे?

टॉक्सिक म्हणजेच विषारी व्यक्तिमत्त्व कसे ओळखावे?

फॅमिली काऊन्सलिंग – मीनाक्षी जगदाळे

दृष्टीचा इलाज होऊ शकतो, दृष्टिकोनाचा नाही या उक्तीनुसार, आपल्या नित्य आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटतात. आपल्या घरात, समाजात आजूबाजूला अनेक प्रकारचे लोकं असतात. त्यातील काही लोकांमुळे, त्यांच्या सहवासामुळे, संपर्कामुळे, सान्निध्यात आल्यावर, साधं त्यांच्याशी दोन मिनिट फोनवर बोलल्यावर आपण हसतो, फ्रेश होतो. आपली मानसिकता निरोगी राहते. जे लोक आपल्याला आदर करतात, आपल्या भावना समजावून घेतात, आपलं कौतुक करतात, मार्गदर्शन करतात, आपल्याला सहकार्य आणि मदत सुद्धा करतात अशा लोकांमुळे आपल्या आयुष्याला योग्य वळण, योग्य दिशा मिळते. अगदी आपली चूक सुद्धा जे लोक समजूतदारपणे आपल्याला न दुखावता लक्षात आणून देतात असे लोक सुद्धा खूप व्यापक विचारसरणीचे आणि अनुभवी असतात. आपल्या घरातील, समाजातील सर्वच लोकं असे असतील तर, आपल्यासारखे भाग्यवान कोणीच नाही. दुर्दैवाने आपण कितीही चांगले असलो तरी अनेकदा आपल्या आयुष्यात खूप त्रास, संकट, अपमान, मानहानी, नुकसान सहन करण्याची वेळ येते कारण असते आपल्याशी संबंधित टॉक्सिक लोकं म्हणजेच विषारी व्यक्तिमत्त्व असलेली लोकं. अशा लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच दूषित असतो आणि आपण चुकीचेच आहोत आणि असं ते सिद्धच करून राहतील हे व्रतच त्यांनी स्वीकारलेले असते. या लेखमार्फत आपण जाणून घेणार आहोत की, असे टॉक्सिक लोकं कसे ओळखायचे? त्यांची लक्षणं काय? त्यांच्यापासून आपण वेळीच कसे सावध व्हावे आणि स्वतःला दूर ठेवावे जेणेकरून आपली मानसिक आणि भावनिक हानी होणार नाही.

आपल्या आजूबाजूचं वातावरण खराब होणार नाही, आपल्यावर कळत न कळत दबाव येणार नाही, आपल्याला कोणताही शारीरिक, मानसिक आजार अशा लोकांमुळे जडणार नाही याची काळजी घेणे आपल्याच हातात आहे. अशा लोकांमधील पाहिला गुणधर्म म्हणजे हे लोकं प्रचंड खोटे बोलतात, कधीही कोणाला दिलेला शब्द पाळत नाहीत, कधीही वचन पूर्ण करत नाहीत. ऐक खोटे लपवायला दुसरे, दुसरे लपवायला तिसरे अशी खोटे पणाची मालिकाच या लोकांच्या आयुष्यात सुरू असते.

दुसऱ्याला अडचणीत आणणे, दुखावणे, एखाद्याला दुःख देणे हे लोकं सहजरीत्या करतात. त्यात त्यांना जराही वावगे वाटत नाही. हम करे सो कायदा अशी यांची मनोवृत्ती असते. या लोकांना कोणीही विरोध केलेला सहन होत नाही. स्वतःचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी स्वतःचंच नुकसान झाले तरी चालेल म्हणजेच ‘मोडेन पणं वाकणार नाही’ या भूमिकेत ही लोकं कायम असतात. असे लोकं दुसऱ्याला धोका देण्यात, फसवण्यात, गंडा घालण्यात, चालाखी करण्यात अग्रेसर असतात. मोठ्या प्रमाणात स्वार्थीपणा, मतलबीपणा यांच्यात असतो आणि हा स्वार्थ साध्य करण्यासाठी ते कोणत्याही पातळीला जाऊ शकतात. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या कोणालाही ते स्वतःच्या फायद्यासाठी बळीचा बकरा बनवू शकतात. टॉक्सिक लोकं स्वतःचे रंग कायम बदलतात ऐक सारखं ते कधीच वागत नाहीत. त्यामुळे त्यांचा सहजासहजी त्यांच्या वागण्याचा अंदाज येत नाही. परिस्थितीनुसार, वेळेनुसार, सोयीने आणि जे समोर असेल, जे साधायचं असेल त्यानुसार हे लोकं स्वतःला भासवतात. त्यामुळे सर्वसामान्य लोक गोंधळात पडतात आणि या व्यक्तीला ओळखण्यात चूक करतात. डबल ढोलकी किंवा दुतोंडी असे लोकं कुठल्याही विषयावर, मतावर, निर्णयावर ठाम नसतात. चित्रपटातील कलाकारांसारखे अनेक पात्र हे लोकं एकटेच लीलया साकारतात. टॉक्सिक लोकांमधील अत्यंत चुकीचा गुणधर्म म्हणजे हे लोकं खूप नकारात्मक असतात. कोणीही त्यांच्याशी काहीही बोलले तरी ते त्याचा उलटा अथवा चुकीचा अर्थ घेतात. हे लोकं सतत इतरांची निंदा करत असतात आणि इतरांबद्दल वाईट विचार करत असतात. जे लोकं इतरांबद्दल तुमच्याजवळ वाईट बोलतात तिथेच समजून जायचं की, हे तुमच्या माघारी तुमची पण निंदा करणार आहेत. त्यामुळे इतरांची निंदा करणाऱ्या लोकांसोबत जास्त संवाद करणे टाळणेच आपल्या हिताचे असते.

टॉक्सिक लोकं अनेकदा इतरांच्या मागे निंदा करण्यात पुढे असतात. ती निंदा पण कोणत्याही फार मोठ्या गहन अभ्यासातून, अनुभवातून आलेली नसते तर निव्वळ जळकी वृत्ती, द्वेष, विकृती, असुया, मत्सर यातूम ते इतरांना टार्गेट करत असतात. अशा लोकांच्या सान्निध्यात राहणे चुकीचे आहे कारण ते इतरांची मतं पण कलुशीत करून एकमेकात भांडण लावतात, गैरसमज पसरवतात. टॉक्सिक लोकांनी स्वतः कितीही चुका केल्या, कितीही खोटे बोलले अथवा त्यांच्यामुळे कितीही नुकसान झाले तरी त्यांना त्याबद्दल अपराधीपणाची भावना नसते. उलट हे लोकं दुसऱ्याला चुकीचा ठरवून त्याला कमी लेखून त्यालाच गिल्टी फीलिंग देतात. माफी मागणे, माघार घेणे यांच्या स्वभावात दिसूनच येत नाही. समोरील व्यक्तीला मात्र खूपदा माफी मागायला लावणे, स्वतःसमोर झुकवणे, कमीपणा घ्यायला लावणे, चूक नसतानाही समोरच्याला बेइज्जत करणे, त्याला आपल्या धाकात दहशतीमध्ये ठेवणे, स्वतः माघार न घेणे पण समोरच्याला वारंवार तो कसा नालायक आहे हे पटवून देणे हे दुर्गुण टॉक्सिक लोकांमध्ये पाहायला मिळतात. इतरांना चूक नसतानाही वाटेल ती परिस्थिती मनाविरुद्ध स्वीकारायला लावणे, सहन करायला लावणे, स्वतःचे निर्णय इतरांवर लादणे आणि तस नं केल्यास त्या व्यक्तीला मानसिक खच्चीकरण करून, बदनामी करून त्रासून सोडणे यात टॉक्सिक लोकं सतत व्यस्त असतात. असे लोकं इतरांना आपली चांगलीच बाजू दाखवतात, प्रभावी संवाद कौशल्य वापरून स्वतःची सकारात्मक प्रतिमा ते इतरांच्या मनात तयार करतात.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -