एका महिलेचा मृत्यू, तीनजण जखमी तर अनेकजण अडकल्याची माहिती
मुंबई : मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग (Heavy rainfdall) सुरु आहे. मात्र, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या ग्रँट रोडमधील (Grant Road) नाना चौकात रुबिनिसा मंझिल या इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनेकजण इमारतीमध्ये अडकल्याची माहिती आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राउंड प्लस चार मजली इमारतीच्या बाल्कनी कोसळल्या. इमारत जुनी असून काही भाग सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा घटनास्थळी आले होते. जवळपास ४० जण आत अडकल्याची माहिती आहे तर काहींना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे. मात्र, इमारतीचा आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता आहे.
‘एका तासाच्या आत सर्वजणांना बाहेर काढले जाईल. प्रशासनाने इमारतीला धोकादायक जाहीर केलं होतं. पण, काही लोक तेथेच राहिले होते. आतापर्यंत जीविनहानीची माहिती नाही. पण, काहीजण जखमी झाले आहेत. युद्धपातळीवर अग्निशमन दलाचे जवान जखमींना बाहेर काढण्याचं काम करत आहेत’, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.