
भाईंदर(वार्ताहर): भाईंदर पूर्वेकडील नवघर रोड येथे मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या प्रवाशांनी भरलेल्या बसने बस थांब्यावरुन निघताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका महिलेला जोरदार धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक रिक्षा आणि खाजगी वाहनाला सुध्दा धडक दिली. बसचे ब्रेक फेल झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून घटनेनंतर नागरिकांनी बसची तोडफोड केली असून पोलीसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.
भाईंदर पूर्वेकडील नवघर रोड वरील बसच्या मुख्य स्थानकातून महापालिका परिवहन सेवेची बस प्रवाश्यांना घेऊन निघाली आणि काही क्षणातच समोरच उभ्या असलेल्या एका महिलेला धडक दिली. त्या नंतर नियंत्रण सुटलेल्या बस चालकाने एक रिक्षा आणि खाजगी वाहनाला सुध्दा धडक दिली.
मृत झालेल्या ५८ वर्षांच्या महिलेचे नाव दुर्गादेवी बिस्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी सरकारी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात नेला. या बसचे ब्रेक फेल झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी बसची तोडफोड केली. नवघर पोलीसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.