मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Govt.) सीएनजीच्या (CNG Price Hike) दरांमध्ये प्रतिकिलोमागे १.५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर घरगुती पाईपलाईन गॅसची देखील दरवाढ जाहीर करण्यात आली. यासह पावसाच्या अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या (Vegetables) दरातही मोठी वाढ झाली होती. दूध, भाज्या, फळे, तेल अशा गरजेपयोगी लागणाऱ्या गोष्टींच्या सातत्याने वाढत चाललेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडत आहे. वाढत्या महागाईत आता मुंबईकरांचा प्रवास (Expensive Travel) देखील महागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर रिक्षा संघटनेनंही भाडेवाढ करण्याची मागणी उचलून धरली आहे. रिक्षा चालकांनी प्राथमिक दर २३ रुपयांवरून २५ रुपयांवर तर प्रति किमी रनिंग भाडे १५.३३ रुपयांवरून १६.९९ रुपये केले जाण्याची मागणी केली आहे. (Rikshaw-Taxi Travel Price Hike)
दोन वर्षाआधी केलेली दरवाढ
ऑक्टोबर २०२२ रोजी रिक्षाच्या दरात २१ रूपयांवरून २३ रूपये तर, टॅक्सीच्या दरात २५ रुपयांवरून २८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरवाढ होऊन आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यातच आता सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, रिक्षा भाडेवाढीच्या मागोमाग आता टॅक्सी युनियनही दरवाढीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय येत्या काळात घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे.