पालघर : नालासोपारा (Nalasopara) पश्चिमेस नाळे गावात असलेली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची वास्तू कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेची वास्तू पार मोडकळीस आली आहे, पण वसई पंचायत समितीचे बांधकाम विभाग मात्र निद्रित अवस्थेत आहे.
ही शाळा सव्वाशे वर्षे जुनी असून या शाळेत चारशे ते पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत होते. पण आता हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. गेल्या तीस वर्षांत या शाळेला दुरुस्ती व डागडुजीसाठी आर्थिक निधीच मिळाला नाही. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकले. आज या शाळेची वास्तू कोणत्याही क्षणी कोसळू शकते. कौले तुटली आहेत, फरशा उखडल्या आहेत व सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य, पाण्याची सोय नाही, अशा परिस्थितीत काही विद्यार्थी जीव मुठीत धरून या शाळेत शिक्षण घेत आहेत.
सध्या या शाळेतील मुलांना जो पोषण आहार मिळतो, त्याचा दर्जाही अत्यंत सुमार असा असतो. गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (गटशिक्षण) व पंचायत समितीचे सभापती या सर्वांचा हलगर्जीपणा यास कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.