Saturday, July 5, 2025

Crime : मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक!

Crime : मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक!

नवी मुंबई : मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याचे तसेच मेट्रो स्थानकावरील दुकान गाळा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महाठगाने मित्राकडून तब्बल ५६ लाख रुपये उकळून, त्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. जिमेश नायर असे या महाठगाचे नाव असून, त्याने अशाच पद्धतीने अनेक लोकांना कोट्यवधींचा गंडा घातला. खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, त्याचा शोध सुरु केला आहे.


या प्रकरणातील आरोपी जिमेश नायर हा २०१८ मध्ये खारघर सेक्टर-३६ मधील व्हॅली शिल्प इमारतीत राहत असताना, त्याने त्याच इमारतीत राहणाऱ्या परमार नामक व्यक्तीसोबत कौटुंबिक मैत्री केली. त्यानंतर त्याने परमार यांच्या पत्नीला मंत्रालयात नोकरीला लावण्याच्या बहाण्याने परमार याच्याकडून नोव्हेंबर २०२१ मध्ये ६ लाख रुपये घेतले. मात्र जिमेश नायरने त्याच्या पत्नीला मंत्रालयात कामालाही लावले नाही, त्यानंतर जिमेश नायरने सिडकोतील अधिकारी त्याच्या ओळखीचे आहेत, असे सांगून त्यांच्या माध्यमातून परमारला सिडकोचा फ्लॅट स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. जिमेश नायर हा कौटुंबिक मित्र असल्याने परमारने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला मार्च २०२२ मध्ये २३ लाख रुपये दिले. मात्र जिमेशने वेगवेगळी कारणे सांगून, परमारला सिडकोतील फ्लॅट मिळवून दिला नाही.


त्यानंतर जिमेश नायर याने सीबीडी-तळोजा मेट्रो स्टेशन वरील गाळ स्वस्तात मिळवून देण्याचे अमिष दाखवून परमार याच्याकडून १ लाख रुपये उकळले. तसेच,त्याने बँकेने जप्त केलेली चार चाकी गाडी घेऊन देण्याचे अमिष दाखवून त्याच्याकडून आणखी ७ लाख १५ हजार रुपये उकळले,अशा पद्धतीने जिमेश नायरने परमार यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून तब्बल ५६ लाख ६८ हजार रुपये उकळले. मागील चार-पाच वर्षांपासून वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक करत असलेल्या जिमेश नायर याच्याकडे परमारने आपले पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र त्याने परमाला पैसे न देता, घर सोडून दुसरीकडे पलायन केले. अखेर परमार यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Comments
Add Comment