बैठकीत जिल्ह्यातील समस्यांकडे वेधले मंत्र्यांचे लक्ष
पालघर : वसईचे आ. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी अधिवेशनाच्या काळात गेल्या दोन दिवसांत विविध खात्यांच्या मंत्र्यांची विधिमंडळात भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. राजेश पाटील, आ. निरंजन डावखरे, माजी महापौर नारायण मानकर व अन्य सहकारी उपस्थित होते.
दर अधिवेशनात वसईचे आ. हितेंद्र ठाकूर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासाच्या प्रश्नावर विविध विभागाच्या मंत्र्यांचे लक्ष वेधत असतात. या अधिवेशनातही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व अन्य मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, रस्त्याची दुर्दशा, वीज, शिक्षण, आरोग्य, शेती व मासेमारी व्यवसायातील प्रश्न इ. समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.
बैठकीत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Guardian Minister Ravindra Chavan) या तिघांनी आ. ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला व प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावू, असे सांगितले. यावेळी आ. ठाकूर यांनी महानगरपालिकेला शासनाकडून मिळणारी अनुदाने वेळेवर मिळावीत, अशी आग्रही मागणी केली. ती उभयतांनी मान्य केली. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्याची सर्व प्रलंबित विकासकामांचा निपटारा लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे.