मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. पोयसर नदीचे पाणी दरवर्षी तुंबते. यामुळे नदीकाठच्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहचते. यामुळे स्थानिक नागरिकांसह व्यापा-यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
पाण्याचा निचरा व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पोयसर नदीच्या काठावर संरक्षण भिंत बांधली आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल मे महिन्यातच येथील शंकरपाडा परिसरात सक्शन पंप बसवून जय्यत तयारी केली होती. परंतु यावर्षी चांगला पाऊस झालाच नव्हता. आज रात्री मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे पहाटे चारच्या सुमारास पाणी साचण्यास सुरूवात झाली.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने येऊन सक्शन पंप सुरू केला. परंतू मागचा आणि पुढचा दोन्ही पाईप फुटल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. परंतू पहाटेची वेळ असल्याने पाईप कठून आणणार असे म्हणत त्यांनी तिथून पळ काढला... अखेर कांदिवली गाव, डहाणुकर वाडी, शंकरपाडा, लालजीपाडा, अभिलाख नगर, गांधी नगर या भागात पोयसर नदीकाठचे रस्ते देखिल दुथडी भरून वाहत होते. यात अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे.