
नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम (Upendra Dwivedi) आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले असून त्यांनी जनरल मनोज पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्याकडून ३०वे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे काल ३० जून रोजी चार दशकांहून अधिक काळ देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले.
जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) एक कुशल लष्करी अधिकारी असून त्यांनी सशस्त्र दलात ४० वर्षे सेवा केली आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथील सैनिक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले जनरल द्विवेदी यांना १९८४ मध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते.
तांत्रिक प्रगती आणि आधुनिक युद्धाच्या बदलत्या पद्धतीमुळे सुरक्षा क्षेत्रातील आव्हाने अधिक स्पष्ट होत असताना जागतिक भू-सामरिक वातावरण गतिमान झाल्याच्या काळात त्यांनी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रासमोर उभ्या असलेल्या वाढत्या सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी परिचालन तयारी करणे हे लष्करप्रमुखांचे मुख्य केंद्रित क्षेत्र म्हणून ठळकपणे ओळखले जाईल. त्याचवेळी देशाचे संरक्षण भक्कम करण्यासाठी असंख्य अपारंपरिक सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी एक केंद्रित प्रतिसाद रणनीती तयार करणे हेदेखील लष्करप्रमुखांचे प्राधान्य क्षेत्र असेल.
अनपेक्षित संकटांना तोंड देण्यासाठी प्रभावीपणे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचा अनुभव जनरल द्विवेदींना आहे. त्यांनी विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले असून राष्ट्रीय सुरक्षेतील ग्रे झोन परिस्थितीचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जनरल द्विवेदी यांना सुरक्षा क्षेत्रातील आधुनिक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाची सखोल माहिती आहे तसेच ते परिचालन प्रभावीपणा वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि लष्करी प्रणाली एकीकृत करण्याचा विचारपूर्वक दृष्टीकोन बाळगून आहेत. आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून आधुनिकीकरण आणि क्षमता विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय लष्कराच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना त्यांच्या या दृष्टीकोनातून एकरूपता मिळते.