
परिसरात धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे : पुण्यात आज पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने टँकर चालवत (Pune Accident) मॉर्निंग वॉक करणाऱ्या अनेकांना उडवल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती. सातत्याने पुण्यात घडणाऱ्या घटनांमुळे खळबळ पसरली आहे. अशातच आता पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad Fire) शहरातील सांगवी परिसराजवळ पत्राशेड झोपडपट्टीमधील घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील शिवरामनगर शेड झोपडपट्टी घरांना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही आग लागली. या परिसरात अवैध पद्धतीने गॅस सिलेंडर रिफिलिंग केलं जात होतं. त्यावेळी दोन ते तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे येथील अनेक घरांना भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. मोठ-मोठे धुराचे लोट पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तीन अग्निशमन बंबच्या सहाय्याने सध्या आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरांना भीषण आग लागल्यामुळे घरातील अनेक साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे घरात राहणाऱ्या रहिवाशांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.