हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
मुंबई : पावसाने राज्यासह देशभरात (Maharashtra Weather) दमदार हजेरी लावली आहे. मात्र अजूनही काही भागात वरुणराजाने (Monsoon) हजेरी लावली नसल्याने नागरिकांना उष्णतेच्या झळांचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. तर काही भागात अतिमुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून (IMD) या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत असेल असे वातावरण
मुंबई शहर (Mumbai Monsoon) आणि उपनगरात मधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज आहे. इथे आज सामान्यतः ढगाळ आकाश राहील. तर, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २६°C च्या जवळपास असेल.
तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस
दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.