Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीDengue Fever : नागरिकांनो काळजी घ्या! राज्यभरात वाढतेय डेंग्यूचे थैमान

Dengue Fever : नागरिकांनो काळजी घ्या! राज्यभरात वाढतेय डेंग्यूचे थैमान

राज्यात ४० तर कोल्हापूरात ७० टक्क्यांनी रुग्णसंख्येमध्ये वाढ

मुंबई : पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यात डेंग्यूच्या (Dengue) साथीचा देखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनातून दिलासा मिळाला असतानाच राज्यातील विविध जिल्ह्यांमधून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. सातत्याने डेंग्यूच्या रुग्णांची टक्केवारी वाढत असल्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर (Health department) नवे आव्हान उभे राहिले आहे.

२३ जिह्यांत डेंग्यूचा वाढता डंख

राज्यात यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ४० टक्के वाढ झाल्याचे समोर येत आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार ७ मेपर्यंत एकूण १ हजार ७५५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या १ हजार २३७ होती. राज्यभर डेंग्यूबाबत सतर्कता असूनही २३ जिह्यांत डेंग्यूचा डंख वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते. यामध्ये पालघर ५५ टक्के, तर कोल्हापुरात ७० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी कोल्हापुरात या कालावधीत ६९ रुग्ण होते. यंदाच्या वर्षी ती संख्या ११७ इतकी झाली आहे.

जगभरातील शंभर देश डेंग्यूच्या विळख्यात

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरातील सुमारे शंभर देश डेंग्यूच्या विळख्यात अडकले आहेत. चंद्रपूर, रायगड आणि वर्धा जिह्यात पावसाळ्यापूर्वी डेंगयूचे एकही प्रकरण नोंदवले नव्हते. परंतु यावर्षी अनुक्रमे ५१, ४६ आणि ४५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. लडाखमध्येही डेंग्यूच्या प्रकरणांची वाढ होत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार अलीकडच्या दशकात डेंग्यूच्या कचाट्यात जगातील निम्मी लोकसंख्या आली आहे. आईसीएमआर डेंग्यूवर लस शोधण्याचे काम करत आहे. तसेच, देशभरातील डेंग्यू संवेदनशील भागांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे.

मुंबईत मलेरियाचे सर्वाधिक रुग्णसंख्या

देशभरात डेंग्यूसोबत मलेरियाने देखील डोके वर काढले आहे. मुंबईत मलेरियाचे सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत आहेत. यावर्षी ४ हजार ५५४ मुंबईत मलेरियाग्रस्त रुग्णांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर, गडचिरोली जिह्यात ४ हजार ५२५ मलेरियाचे रुग्ण आढळले.

लक्षणे

अचानक ताप येणे, खूप मोठ्या प्रमाणात डोकेदुखी, सांधेदुखी आणि डोळ्यांची जळजळ आणि डोळेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. तापासोबत जोरदार धाम येणे, संपूर्ण अंगदुखी, उलट्या होणे ही मलेरियाची लक्षणे आहेत. डेंग्यू-मलेरिया होऊन गेल्यानंतर केस गळण्याची समस्या वाढू शकते. त्यासोबत दीर्घकालीन सांधेदुखी, स्नायू कडक होणे, वजन कमी होणे आणि थकवा येणे अशा अनेक समस्या दिसून येतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -