
मुंबई : राज्यात पोलिस भरती (Police Bharti) प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती उद्या पासून सुरू होणार असून यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र यंदा या पोलीस भरतीसाठी १७ हजार ४७१ जागांसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांची भरतीसाठी मोठी स्पर्धा असणार आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर केली होती. त्यानुसार राज्यातील १७,४७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन यासह विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
जागा कमी अन् स्पर्धा फार
पुणे पोलीस दलात २०२ पदांसाठी २० हजार ३८२ अर्ज, पुणे जिल्हा ग्रामीण दलामध्ये ४९६ पदांसाठी ४२ हजार ४०३ उमेदवारांनी अर्ज, कारागृहातील शिपाई पदाच्या ५१३ जागांसाठी एक लाख १० हजार ४८८ अर्ज, पुणे लोहमार्ग विभागाच्या ६८ पदांसाठी ३ हजार १८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
त्याचबरोबर कारागृह विभागातील शिपाई या एका पदासाठी २०७ अर्ज करण्यात आले आहेत. चालक पदासाठी १६८९ जागांसाठी १ लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले आहेत. पोलीस शिपाईच्या ९५९५ जागांसाठी ८ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. या अर्जदारांमध्ये ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जागा कमी आणि स्पर्धा फार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलीस भरती पुढे ढकला
राज्यात उद्यापासून सुरु होणारी पोलीस भरती पुढे ढकलावी, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. राज्यातील पावसामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तर पावसामुळे अनेक उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे पोलीस भरती पुढे ढकलावी, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे.
कोणत्याही आमिषाला बळी पडू नका
दरम्यान, पावसामुळे कोणत्याही उमेदवारांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. पोलिसाच्या नोकरीसाठी कोणत्याही आमिषाला बळू पडू नये, असे आव्हान पोलीस आयुक्तांनी केले आहे. त्याचबरोबर उमेदवारांची सर्व व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.
उद्यापासून भरती प्रक्रिया सुरु
राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया उद्या पासून सुरू होणार आहे. यामध्ये उमेदवारांची शारीरिक मोजमाप पडताळणी व मैदानी चाचणी केली जाणार आहे. तीन ठिकाणी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. खुल्या गटासह एकंदर अकरा प्रकारच्या जातीय व आर्थिक प्रवर्गांच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेतून पोलिस भरती केली जाणार आहे.