Sheena Bora case : धक्कादायक! शीना बोरा हत्याकांडातील शीनाच्या मृतदेहाचे जप्त केलेले अवशेष गायब

सीबीआयने कोर्टात दिली कबुली


मुंबई : मुंबईतील शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora murder case) हे अत्यंत गाजलेलं प्रकरण आहे. शीना बोरा या २४ वर्षीय तरुणीची २०१२ साली हत्या करण्यात आली होती व या प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) मुख्य आरोपी असल्याचे सिद्ध झाले होते. अनेक दिवस त्या तुरुंगात होत्या, सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जप्त केलेले शीनाच्या जळालेल्या हाडांचे अवशेष गायब झाले आहेत. खूप शोधाशोध करुनही हे अवशेष सापडले नाहीत. सीबीआयने आज कोर्टात तशी कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.


मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी सीबाआय साक्षीदार हजर करू शकलेली नाही. शीना बोराच्या मृतदेहाच्या अवशेषातील काही हाडं सीबीआयकडून कोर्टात सादर केली जाणार होती. या हाडांच्या आधारावरच जे जे रुग्णालयातील अॅनाटॉमी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापकांची साक्ष होणार होती. मात्र, आता शीना बोराच्या सांगाड्यातील हाडं सापडत नसल्याने आजवर तब्बल तीनवेळा सुनावणी तहकूब झाली आहे. तूर्तास खटल्याची सुनावणी २७ जून पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, ही सुनावणी जलदगतीने संपवण्याकरता मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने कोर्टाकडे विनंती केली आहे.


सध्या न्यायालयाकडून शीनाच्या सांगाड्याची सर्वप्रथम तपासणी करणाऱ्या जे.जे. रुग्णालयातील न्यायवैद्यक शाळेतील डॉक्टरांची साक्ष नोंदवून घेतली जात आहे. यावेळी सीबीआयकडून शीनाच्या सांगाड्याचे अवशेष न्यायालयात सादर केले जाणे अपेक्षित होते. त्याआधारे फॉरेन्सिक तज्ज्ञांची साक्ष नोंदवून घेतली जाणार होती. मात्र, आता हे अवशेष मिळत नसल्याची माहिती सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात दिली. त्यामुळे शीनाच्या सांगाड्याचे अवशेष नेमके गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



कुठे व कशी सापडली होती हाडे?


INX मीडियाच्या माजी सीईओ इंद्राणी मुखर्जी यांची मुलगी शीना बोरा हिची २०१२ मध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती. इंद्राणीने तिचा माजी पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यासोबत मिळून शीनाची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर त्यांनी मृतदेह महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण गावच्या जंगलात नेऊन जाळला.


पेण गावातून २०१२ मध्ये पोलिसांनी काही हाडे जप्त केली होती. तपासात ही हाडे प्राण्याची नसून मानवी मृतदेहाची असल्याचे समोर आले. या खुनाची ३ वर्षे कोणालाही माहिती नव्हती. २०१५ मध्ये आणखी एका प्रकरणात पोलिसांनी इंद्राणीचा ड्रायव्हर राय याला अटक केली होती. यादरम्यान त्याने शीना बोराच्या हत्येचा खुलासा केला.


या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने २०१५ मध्ये पुन्हा जंगलातून काही अवशेष गोळा केले. सीबीआयने हे अवशेष दिल्लीच्या एम्समध्ये तपासासाठी पाठवले आहेत. सीबीआयला हे अवशेष २०१२ मध्ये सापडलेल्या हाडांशी जुळवायचे होते. मात्र, २०१२ मध्ये जप्त करण्यात आलेली हाडे हरवल्याचे गुरुवारी जेजे रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांच्या साक्षीदरम्यान उघडकीस आले.



काय आहे शीना बोरा हत्याप्रकरण?


शीना बोरा हत्याप्रकरण प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला साल २०१५ मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीने २५ एप्रिल २०१२ रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. २०१५ मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आले होते.


इंद्राणीने मुंबईतील वांद्रे येथे शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण परिसरातील गागोदे गाव गाठलं होतं. या गावाच्या परिसरात शीनाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. २०२० मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.

Comments
Add Comment

यंत्रमाग उद्योगांना वीज सवलत योजनेच्या लाभासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य

मुंबई : राज्यातील वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार

विभागाच्या आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी

पंतप्रधान ८-९ ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर; मुंबईकरांना मिळणार 'दुहेरी भेट'! 

१९,६५० कोटींच्या नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान करणार उदघाटन ३७,२७० कोटींचा मुंबई मेट्रो

मुंबईत झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत

झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार. मुंबई : मुंबईतील क्षेत्रात मोठ्या खाजगी, शासकिय,

राज्य सरकारचे ‘पुनर्वापर धोरण २०२५’ जाहीर, ४२४ शहरांना मिळणार लाभ

मुंबई : राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस

महाराष्ट्र राज्याचे रत्ने व आभूषणे धोरण – २०२५ जाहीर

राज्याच्या गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्रासाठी झळाळी एक लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार