Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनअति सामान्य मुलीची असामान्य उद्योग भरारी

अति सामान्य मुलीची असामान्य उद्योग भरारी

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या पाठबळावर यशाची शिखरे पादांक्रात करता येतात. याचे चालते बोलते उदाहरण आहे आंध्र प्रदेशच्या ज्योती रेड्डीचे. घराच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये जन्मल्यामुळे आई असूनसुद्धा ज्योतीला तिच्यापासून दूर राहावं लागलं. गरिबीचे, दारिद्र्याचे टक्के-टोणपे खाल्लेली ज्योती आज स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी अमेरिकेत चालवत आहे. मजुरी करत असताना दिवसाचे पाच रुपये मिळविणारी ‘ती’ आज करोडो रुपयांची उलाढाल करत आहे. ज्योती रेड्डीचं डोकं सुन्न प्रवास आयुष्य सन्मार्गाने यशस्वी होऊ पाहणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी आदर्श असा वस्तुपाठच आहे.

आंध्र प्रदेशातील वरंगळ गावात १९७० मध्ये जन्मलेल्या ज्योतीचं खडतर बालपण गेलं. पाच मुलींमध्ये ती सर्वांत लहान. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती. या परिस्थितीमुळे अनाथाश्रमात ठेवायचा निर्णय तिच्या घरच्यांनी घेतला. आईविना पोर अशी अनाथाश्रमवाल्यांनी तिची नोंद केली. या नोंदीमुळेच तिला संपूर्ण बालपण आईशिवाय काढावं लागलं. इच्छा असून देखील आईला भेटता येत नसे. आनंद-दु:ख व्यक्त करायला जवळचं असं कुणीच नव्हतं. अनाथाश्रमातच असताना आपल्यासमोर असलेल्या प्रतिकूल परिस्थितीची तिला जाणीव झाली होती. ती सरकारी शाळेत जायला लागली. अनाथाश्रमाच्या अधीक्षकांच्या घरात राहत असताना तिने तांत्रिक अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण देखील घेतलं. प्रथम श्रेणीत ती दहावी उत्तीर्ण झाली. पण परत एकदा ज्योतीला नशिबाने हुलकावणी दिली. आता कुठे तरी नोकरी करून सुंदर आयुष्य जगायचं ज्योतीने ठरवलंच होतं, तर तिच्या नातेवाइकांनी ज्योतीचं एका नात्यातल्याच मुलाशी लग्न लावून दिलं. यावेळी ज्योतीचं वय होतं अवघं १६ वर्षं. लग्नानंतर २ मुले झाली आणि परिस्थिती आणखीनच भयावह झाली. पोटाची भूक भागविण्यासाठी ५ रुपयांच्या रोजंदारीवर तिने शेतात काम करायला सुरुवात केली. अशात एक आशेचा किरण ज्योतीच्या आयुष्यात आला.

केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या रूपाने ज्योतीला नवीन संधी चालून आली. तरुणांमध्ये जनजागृती करण्याचं कार्य नेहरू युवा केंद्र करते. ती नेहरू युवा केंद्राची स्वयंसेविका झाली आणि नंतर प्रौढ वर्गामध्ये शिकवू लागली. या शिकवणीचे तिला फक्त १२० रुपये महिन्याला मिळत. जी तिच्यासाठी फार होती कारण या पैशातून आपल्या बाळांसाठी ती दूध आणि फळे तरी घेऊ शकत होती. आणखी पैसे कमविण्यासाठी रात्रीच्या वेळेस ती पेटीकोट शिवू लागली.  एका पेटीकोटचे तिला १ रुपया मिळे. असे ती २५-२६ रुपये दिवसाला कमवू लागली. तिने टायपिंग देखील शिकून घेतलं. आर्थिक स्थितीशी ती झगडत होतीच पण शिक्षण मिळविण्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर देखील ती लढत होती. न डगमगता १९९४ मध्ये तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली, तर १९९७ साली काकतिया विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. शिक्षणामुळे तिला शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. महिना ३९८ रुपये एवढाच पगार होता. शाळेत जाण्यासाठी तिला ७० किलोमीटरचा २ तासांचा प्रवास करावा लागे. या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी ती आपल्या सहप्रवाशांना साड्या विकू लागली. यातून तिला अतिरिक्त पैसे मिळू लागले. यातूनच वेळेचा सदुपयोग आणि कल्पकता ती शिकली. शेवटी तिला २७५० रुपयांची शाळा तपासणी करण्याची नोकरी मिळाली. मात्र तरी देखील वेगळं करण्याची ऊर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती.

याच दरम्यान तिचा एक दूरचा नातलग अमेरिकेतून आला. त्याच्या जीवनशैलीत कमालीचा फरक पडला होता. आपण देखील आपल्या या नातलगाप्रमाणे सॉफ्टवेअर शिकून अमेरिकेत जावं आणि स्वत:चं आयुष्य बदलावं असं तिने मनाशी ठरवलं. तिने नोकरीतून दीर्घकाळाची सुट्टी घेतली आणि हैदराबाद येथील व्हिसीएल इन्स्टिट्यूट येथे सॉफ्टवेअरचा अभ्यासक्रम शिकू लागली. २००१ मध्ये ज्योतीने अमेरिकेला प्रयाण केले. तिला एका दुकानात ६० डॉलर वेतनाची नोकरी मिळाली. अस्खलित इंग्रजी बोलता येत नव्हतं यावर देखील तिने मात केली. ज्योती एका गुजराती कुटुंबासोबत पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली. याचदरम्यान एका नातेवाइकाच्या ओळखीने तिला सीएस अमेरिका या कंपनीत रिक्रूटरची नोकरी मिळाली. याच काळात तिला मेक्सिकोमध्ये स्टॅम्पिंगसाठी जायचा योग आला. व्हिजा प्रक्रियेमध्ये तयार कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता कशी करतात याचं आपल्याला ज्ञान आहे. मग आपण सल्ला देणारी कंपनी का सुरू करू नये असे तिला वाटले. तिने जमविलेल्या ४० हजार डॉलर्समधून तिने फिनिक्सला एक कार्यालय भाड्याने घेतलं आणि ‘किज’ अर्थात ‘कि सॉफ्टवेअर सोल्यूशन्स’ नावाची कंपनी सुरू केली. जी आजदेखील यशस्वी घोडदौड करत आहे. सध्या या कंपनीत ६० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ज्योतीच्या दोन्ही मुलींनी अमेरिकेत अभियांत्रिकीचं प्रशिक्षण घेतलं आणि लग्न होऊन आज त्या अमेरिकेतच स्थिरस्थावर झाल्या आहेत.

ज्योतीने आता आपल्या ड्रिम प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केले आहे. १ हजार तरुणांना प्रशिक्षित करून त्यांना नोकरी देणे तसेच शिशुवर्गापासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारी शाळा उभारणे हे दोन ज्योतीचे ड्रिम प्रोजेक्ट आहेत. त्याचप्रमाणे ज्योती काही संस्थाशी संलग्न होऊन अनाथ मुलांच्या न्याय्य हक्कासाठी कार्य देखील करतात. सुखी, समृद्ध जीवनाची स्वप्न आपण सगळेच पाहतो. किंबहुना तो आपला अधिकार आहे; मात्र प्रत्येकालाच जन्मतःच तो अधिकार मिळतो का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. तर तो अधिकार मिळविण्यासाठी जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणा या गुणांची मोलाची साथ लागते. ज्योती रेड्डीने याच गुणांच्या पाठबळावर अमेरिकत स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे. पाच रुपयांच्या रोजंदारीवर काम करणारी ज्योती आज स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी अमेरिकेत चालवत आहे. कित्येकांना रोजगारही देत आहे. ज्योतीचा हा असामान्य प्रवास तिला ‘लेडी बॉस’ ठरवतो.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -