हैदराबाद : मीडिया जगताशी संबंधित प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, ईनाडू कंपनी तसेच रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक, चेरुकुरी रामोजी राव यांचे शनिवारी पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. रामोजी यांचे हैदराबादमधील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. पहाटे ३.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात ५ जून रोजी दाखल करण्यात आलं होतं. आज ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांचं पार्थिव हे रामोजी फिल्म सिटी येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ते अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येईल. रामोजी राव यांच्या निधनानंतर हळहळ आणि शोक व्यक्त होतो आहे.
१६ नोव्हेंबर १९३६ या दिवशी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला. रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली.
ते रामोजी समूहाचे प्रमुख होते. प्रख्यात रामोजी फिल्म सिटी, जागतिक स्तरावर सर्वात मोठी चित्रपट निर्मिती सुविधा यासह अनेक मालमत्तेची ते देखरेख करत होते. याव्यतिरिक्त, रामोजी समूहाकडे ईनाडू वृत्तपत्र, ETV नेटवर्क ऑफ टेलिव्हिजन चॅनेल आणि चित्रपट निर्मिती कंपनी, उषा किरण मूव्हीज सारख्या प्रमुख माध्यम संस्था आहेत. रामोजी समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये मार्गदर्शी चिट फंड, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, कालांजली शॉपिंग मॉल, प्रिया लोणचे आणि मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स यांचा समावेश आहे. त्यांनी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन रामोजी राव यांच्यासमवेत फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, श्री रामोजीराव यांचे निधन अत्यंत दु:खद आहे. भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे ते द्रष्टे होते. त्यांच्या समृद्ध योगदानाने पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांद्वारे, त्यांनी मीडिया आणि मनोरंजन विश्वात नाविन्य आणि उत्कृष्टतेसाठी नवीन मानके स्थापित केली.
रामोजी राव हे भारताच्या विकासाविषयी अत्यंत उत्कट होते. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या अनेक संधी मिळाल्या आणि त्यांच्या हुशारीचा फायदा झाला हे माझे भाग्य आहे. या कठीण काळात त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि असंख्य प्रशंसक यांच्या संवेदना. ओम शांती, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…