
भाजपा प्रवक्ते नितेश राणे यांचा विनायक राऊतांना टोला
महाविकास आघाडी हा आपला एकमेव शत्रू मानून आपण काम केलं पाहिजे; नितेश राणे यांचं महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
कणकवली : 'काल लोकसभेचा निकाल लागला आणि एनडीए व महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा ४८ हजार मतांनी विजय झाला. आपल्या हक्काचा आणि विचारांचा खासदार रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जनतेने निवडून दिला. या मतदारसंघाचा पुढचा खासदार हा कमळ चिन्हाचाच असेल, असा विश्वास आम्ही पहिल्यापासून व्यक्त केला होता. इथल्या मतदार जनतेनेही ठरवलं होतं की, दहा वर्षे इथे असलेल्या विनायक राऊत या निष्क्रिय खासदाराला बदलायचं. मोदीसाहेबांना समर्थन देण्याच्या दृष्टीतून हे मतदान झालेलं आहे, यासाठी मी प्रत्येक मतदाराचे आभार मानतो', असं भाजपा प्रवक्ते नितेश राणे म्हणाले. नारायण राणे यांच्या विजयानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाच्या व महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानले तसेच विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.
नितेश राणे यांनी यावेळेस शिवसेना नेते व मंत्री दीपक केसरकर हे वेळोवेळी पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. त्याचसोबत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, की ज्याप्रमाणे केसरकरांनी महायुतीचा धर्म पाळला, त्याचप्रमाणे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो पाळावा. या निवडणुकीच्या निमित्ताने काही कटू अनुभव आले पण त्याची चर्चा पत्रकार परिषदेत न करता महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही निश्चित करु, असं नितेश राणे म्हणाले.
उबाठा व महाविकास आघाडी हा आपला एकमेव शत्रू मानून आपण काम केलं पाहिजे. कुठेही उबाठा किंवा मविआला मदत होत असेल, तर महायुतीसाठी पुढच्या निवडणुका ताकद असतानाही अवघड जातील, असा सल्ला नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुढे ते म्हणाले, त्याचबरोबर उबाठाच्या अदृश्य हातांचेही मी आभार मानतो, ज्यांनी आम्हाला मदत केली. त्यांच्या मदतीमुळे आमचा विजय सुखद झाला.
शिवसैनिकांनी या निवडणुकीत वचपा काढला
कोकणातील शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहेत. त्यांना उद्धव ठाकरे, काँग्रेस किंवा शरद पवार गटासोबत जाणं आवडलं नाही. विनायक राऊतने ज्याप्रमाणे कोकणात शिवसेना संपवायचा प्रयत्न केला, त्याचा वचपा या निवडणुकीत शिवसैनिकांनी काढला आहे. त्यामुळे उबाठा येत्या काळात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होतेय की खर्या अर्थाने पक्ष राहतोय, हे आपल्याला कळेलच, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
माझ्यावरच्या खोट्या आरोपांना मतदारांनी उत्तर दिलं
उद्धव ठाकरेंची जेव्हा रत्नागिरीमध्ये सभा झाली, तेव्हा त्या सभेमध्ये त्यांनी जे शिव्याशाप आम्हाला दिले, राणे साहेबांना नावं ठेवली, त्यानंतर लगेच झालेल्या पत्रकार परिषदेत मी म्हणालो होतो, की याचं उत्तर आमचे मतदार मतपेटीतून देतील. मतदानाच्या माध्यमातून वचपा काढतील आणि तेच खरं झालं. म्हणून मी म्हणतो की उद्धव ठाकरे आम्हाला जेवढ्या शिव्या घालतील, आमच्याविरोधात सभा घेतील, तेवढं आमचं लीड वाढत जातं. माझ्यावर जे काही खोटेनाटे आरोप, टिकाटिप्पणी केली जाते त्यांना उत्तरं देण्याच्या मी कधीच भानगडीत का पडत नाही, कारण माझे मतदार मला विश्वासाने सांगतात की यामध्ये पडू नका फक्त आमच्या विकासात व्यस्त राहा, त्यांना उत्तरं देण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.
मोदींचा राजीनामा मागण्याआधी स्वतःची अवस्था बघा
संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, इंडिया आघाडीवाले कोणत्या गोष्टीचा आनंद मिरवत आहेत, हेच न समजण्यासारखं आहे. ते म्हणतात की, भाजपा हरली आहे, मोदींनी राजीनामा द्यायला हवा. पण आमचे मोदीजी वाराणसीतून दीड लाख मतांनी निवडून आले आहेत. राऊंडमध्ये मतं मागे-पुढे होतात, ही काही जुनी गोष्ट नाही, तू निवडणूक लढवत नाहीस म्हणून तुला माहित नाही. पण तुझ्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरेची त्याच्या वरळी मतदारसंघामध्ये काय अवस्था झाली आहे, हे त्याला जाऊन विचार, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
काँग्रेस नसती तर उबाठाचा एकही खासदार निवडून आला नसता
उद्धव ठाकरे जेव्हा मोदीजींसोबत होता, तेव्हा त्याचे १८ खासदार निवडून येत होते. पण यंदा त्याने २१ जागा लढवल्या आणि त्यातल्या फक्त ९ जागा निवडून आल्या. त्यातही जे खासदार निवडून आले त्यात उबाठाची व्होट बँक किती आहे? त्याचा प्रत्येक खासदार हा अल्पसंख्यांक मतांमुळे निवडून आला आहे. काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना मत दिलं म्हणून ते निवडून आले. काँग्रेसची साथ नसती तर यांचा एकही खासदार निवडून आला नसता, असं नितेश राणे म्हणाले.