‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा हायअलर्ट
मुंबई : काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने (Heat Wave) हैराण झालेल्या नागरिकांची मान्सून (Monsoon) प्रतिक्षा आता संपणार आहे. आज पहाटे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उन्हाची काहीली कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर आज बहुतांश राज्यात मुसळधार पावसाची हजेरी असल्याचे सांगत हवामान विभागाने (IMD) हायअलर्ट जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मान्सून असल्याचा हवामान विभागाने दावा केला आहे. पावसासह आज राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना हायअलर्ट दिला आहे.
‘या’ भागात पावसाचा यलो अलर्ट
मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तापमानात कमालीची घसरण
मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. तर जळगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.