Price hike : भाजीपासून रिअल इस्टेटपर्यंत सर्वांची चांदी

Share
  • अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

सरत्या आठवड्यात भाज्यांपासून चांदीपर्यंत आणि साड्यांपासून रिअल इस्टेटपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये लक्षवेधी घडामोडी पाहायला मिळाल्या. एकीकडे कोथिंबीर आणि भाजीपाला भाव खात असताना, सोने-चांदी महागल्याने कांचीपूरम साड्या महागल्याची माहिती पुढे आली. दुसरीकडे चांदी एक लाख रुपये किलो होणार असल्याची वदंता समोर आली असताना, गोदरेज समूहाने अलीकडच्या काळात दोन हजार कोटींची फ्लॅट विक्री केल्याचा तपशील समोर आला.

पावसाळ्यापूर्वी दर वर्षी भाजीपाल्याचे भाव वाढत असतात. त्यातच या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, आता भाजीबाजारावर त्याचा स्पष्ट परिणाम जाणवू लागला आहे. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही पदार्थाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर सध्या नाशिकमध्ये ७५ रुपये जुडी या भावाने विकली जात आहे. त्यामुळे गृहिणीचे भाजीपाल्याचे रोजचे बजेट कोलमडले आहे. विविध भाजी बाजारांमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने, शेतकरीवर्गाला काहीसा दिलासा मिळत असला, तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने, शेतमालावर परिणाम होत आहे. नाशिक बाजार समितीमध्ये नेहमीच्या आवकेच्या तुलनेत शेतमालाची ५० टक्के आवक झाली आहे. शेतमालाची आवक घटल्याने बाजार भाव तेजीत आहेत. शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असला, तरी सर्वसामान्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत. पालेभाज्या तर मिळेनाशा झाल्या आहेत. उपलब्ध असलेल्या थोड्याफार पालेभाज्यांचे दरही जास्त आहेत. कोणत्याही भाजीचे दर २५ किंवा ३० रुपये पाव किलोपासून सुरू होऊन १२० ते १५० रुपये किलो दरापर्यंत जात आहेत. मेथी आणि कांदापात ५० रुपये जुडी भावाने विकली जात आहे.

आता बातमी चांदीच्या होत असलेल्या चांदीची! दिवसेंदिवस सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. वाढत्या सोन्या-चांदीच्या दराचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात ब्रोकेड वर्कसाठी प्रसिद्ध असलेल्या कांचीपूरमच्या सिल्क साड्या महागल्या आहेत. या साड्यांच्या िकमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे लोक अशा साड्या शोधत आहेत, ज्यात सोने आणि चांदी नाही. कांचीपपूरम सिल्क साड्यांचा रिटेल टेक्सटाईल चेन ब्रँड असलेल्या ‘आरएमकेव्ही’च्या मते किमती वाढल्यामुळे विक्री २० टक्क्यांनी कमी झाली आहे. विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेच ग्राहक विशिष्ट बजेटसह येतात आणि कमी सोने आणि चांदीच्या (कांचीपूरम) रेशमी साड्या पसंत करतात. त्याचप्रमाणे काही ग्राहक आपल्या बजेटनुसार साड्यांची संख्या कमी करतात. इतक्या कमी कालावधीत सिल्क साड्यांच्या किमतीत ३५ टक्के ते ४० टक्के वाढ होण्याची, ही पहिलीच वेळ आहे.

एक ऑक्टोबर २०२३ रोजी २२ कॅरेट सोन्याची किंमत ५,३५६ रुपये प्रतिग्रॅम होती. २१ मे २०२४ रोजी वाढून ती सहा हजार, नऊशे रुपये प्रतिग्रॅम झाली. त्याचप्रमाणे चांदीचा भावही वाढत आहे. यंदा सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे; मात्र चांदीच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीचा फटका सोन्यालाही बसला आहे. ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’(आयबीजेए) च्या आकडेवारीनुसार, २३ मे २०२४ रोजी चांदी ९० हजार ५५ रुपये प्रति किलो या दरावर बंद झाली. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी चांदी ६९ हजार १५० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होती आणि त्या पातळीपासून चांदीच्या किमती ३० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये चांदी प्रतिकिलो एक लाख रुपयांची पातळी ओलांडू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीचा वापर दोन आघाड्यांवर होतो. लोक चांदीचे दागिने खरेदी करतात. गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी चांदीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे त्याकडे आर्थिक मालमत्ता म्हणूनदेखील पाहिले जाते. मात्र चांदीचा वापर औद्योगिक कारणांसाठीही केला जातो. सौर पॅनल बनवण्यासाठी चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सरकारचे संपूर्ण लक्ष स्वच्छ ऊर्जेवर आहे. सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीला चालना दिली जात आहे. अशा स्थितीत आगामी काळात चांदीची मागणी वाढणार आहे. इलेक्ट्रिक कारपासून ५-जी सारख्या तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक गोष्टीत चांदी वापरली जात आहे. एका अंदाजानुसार, उद्योगात ६० टक्क्यांहून अधिक चांदी वापरली जाते.

चांदीचा वापर वाढत आहे, पण मागणीनुसार त्याचे उत्पादन होत नाही. २०१६ पासून, चांदीच्या खाणकामात सतत घट होत असून, मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळेच तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेसच्या मते चांदी कमालीची तेजीत आहे. अलीकडेच ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस’ने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, सोन्यापेक्षा चांदीची वाढ अधिक होईल आणि ती सोन्यालाही मागे टाकेल. गेल्या १५ वर्षांमध्ये चांदीने सातत्याने सात टक्के वार्षिक परतावा दिला आहे. चांदी देशांतर्गत बाजारात एक लाख रुपयांची पातळी गाठू शकते, तर कोमेक्सवर ती प्रतिऔंस ३४ पौंडपर्यंत जाऊ शकते. चांदीच्या दरातील वाढ इथेच थांबणार नसून, चमक आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता कानोसा रिअल इस्टेट क्षेत्राचा नोएडामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मालमत्तेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. दिग्गज रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने नोएडामध्ये निवासी फ्लॅट्सना प्रचंड मागणी लाभत असताना, दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे फ्लॅट विकले आहेत. कंपनीने एकूण ६५० फ्लॅट्सची विक्री केली आहे. ‘गोदरेज ग्रुप’ने या मालमत्ता गोदरेज जर्दानिया प्रकल्पाअंतर्गत विकल्या आहेत. त्या नोएडाच्या सेक्टर १४६ मध्ये आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने नोएडाच्या १४६ सेक्टरमध्ये दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा प्रकल्प सुरू केला होता. त्याचे नाव गोदरेज ट्रॉपिकल आयल होते. त्यातही कंपनीने २००० कोटींहून अधिक किमतीचे फ्लॅट विकले. त्या प्रकल्पाच्या यशानंतर कंपनीने या क्षेत्रातील हा दुसरा प्रकल्प सुरू केला.

Recent Posts

Indian Army : नदीची पातळी वाढल्याने भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात!

दुर्घटनेत ५ जवान शहीद लेह : कारगिलच्या लेह जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.…

6 mins ago

UGC NET Exam : पेपरफुटी प्रकरणाला बसणार लगाम! आता ‘या’ पद्धतीने होणार परीक्षा

परीक्षेत नव्या विषयाची पडणार भर; तारखा जाहीर मुंबई : यूजीसी नेटचा पेपर (UGC NET Exam)…

14 mins ago

RBI Action : आरबीआयचा अ‍ॅक्शन मोड! नियमांचे उल्लंघन केलेल्या ‘या’ बँकेवर लाखोंची कारवाई

मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची…

58 mins ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…

7 hours ago

जनहितैषी अर्थसंकल्प!

ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…

10 hours ago