Tuesday, July 9, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनयेईल पुन्हा बहर

येईल पुन्हा बहर

माेरपीस: पूजा काळे

विश्वासाच्या वाटेवर, वाट पाहिन पाहा, सहवास तुझा हवा, मज रोज नवा. आसवांची वाट मोकळी होते; जेव्हा तुझी सोबत नसते. सहवासरूपी नजरबंद आठवणी मन:पटलावर तरंग उठवतात. तरंग सहवासाचे, तरंग प्रेमाचे, तरंग जीवाला जीव देणाऱ्या हृदयस्थ गलबलीचे. खरं तरं सहवासानेचं तुला ओळखू लागले होते मी. तुझ्यासाठी हे मन वेडे अन् ओवते मी त्यात भावफुले. तुझा वसंत सुखाचा, मन माझे शिशिर. काळजात अजूनही, वाढे जुनी हुरहुर. ऐक ना सखया! तुझ्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर ताटकळत अजूनही उभी असते मी. आता तिथले रस्ते, पानं-फुलं इतकंच काय तर, तिथली पाखरं देखील ओळखू लागलीत मला. किमान उडावयास पंख असते ना….! तर खिडकीतल्या खिडकीत डोकावून डोळे भरून पाहिलं असतं तुला.

निदान एखादं झाड होण्याचं भाग्य लाभलं असतं ना, तर फांद्या, वेल होऊन तुझ्याचं घरा शेजारीलं भिंतींवर दिमाखात उभी दिसली असते मी. खरं सांगतेय हो मी… तुझ्यासाठी पानं, फांदी, वेल, पक्षी यातलं काहीही होणं आवडलं असतं मला. कधी विरहात शिशिर, तर कधी मन धावे वसंत वाटेवर; या अवस्थेत जाई-जुई, चमेली, मोगरा, मधुमालती यासम वासंतिक फुलं होऊन फुलण्याचा बरसण्यासाठीचा, हा वेडेपणा करायला तयार आहे मी. तुला माझी अवस्था कळली असती तर…!! पोर्णिमेच्या चंद्राची आरास चैन पडू देत नाहीय आज. सुखासीन, गाढ-भरल्या झोपेवर पापण्यांची उघडझाप जादू करून गेलीयं. छूमंतर करीत आलेल्या वाऱ्याने आपल्या मंदधुंद नजाकतीने फेर धरलायं. भरीस भर म्हणून तू दिलेल्या मधूमालती वेलफुलांच्या घमघमाटाने माझ्या चित्तवृत्ती जाग्या झाल्यात.

जगू कशी तुझ्याविना, साद न येई हाकेला. दूरदूर जाता प्रिया, हुंदका ही अडलेला. पहिल्यांदाचं कॉलेजच्या लायब्ररीत पुस्तक अदला बदलीच्या निमित्तानं झालेली त्याची भेट. मग पुरेपूर कॉफी आस्वादात घोळू लागलेला वेळ, त्याच्या येण्या-जाण्याने आवडू लागलेला तो. अखेर जीवनविषयक दृष्टिकोन जुळता जुळता नावडणाऱ्या गोष्टीही आवडीत गुंतू लागलेल्या. लायब्ररी बाजूच्या दगडी भिंती शेजारील बेंच हे भेटण्याचं एकमेव ठिकाण. सोबतीला स्थिरावलेली, बहरलेली आश्वासक मधुमालती वेल. हिरव्या जर्द पानझडीत पांढरट, गुलाबी लाली पसरवत झुपकेदार दाटीवाटीतला तिचा परिमळ फायालाही मागे सारणारा. खऱ्या भावनांचा सुंदरसा ताजमहाल होता तो.

राजा-राणीच्या प्रीत आगोशातला गंधाळलेला प्रीत संगम होता तो. सोबतीला होता फक्त लडबडलेला मधुमालती वेल. ग्रिष्म ऋतूच्या झळा न जाणवण्याइतपत अलवार प्रित हंगाम होता तो. त्याचवेळी वसंत बहारातल्या वासंतिक फुलांचा बहर आयुष्य सुगंधित करत होता. परीक्षेच्या दोन दिवस आधी आपण भेटलो. मनमुराद रडलो, हसलो, ते महिन्याभराने भेटण्यासाठी. त्या दिवशी त्याने प्रथमच मधुमालतीला हात लावला आणि मलासुद्धा. फुलांच्या मोठ्या गुच्छासोबत नर्सरीतून आणलेलं मधुमालतीचं रोप हातात देत, कपाळाचं चुंबन घेतलसं आपण बाहेर पडलो, ते पुन्हा न भेटण्यासाठी. त्यानंतर… त्यानंतर तू आलास नाहीस ते अद्याप. ओसाड माळरानावरचं निष्पर्ण असं झाडं झालयं माझं आयुष्य. संपत आलाय सारा वसंत बहार. आता फक्त निघतो हुंकार डहाळीतून, देठातून पान न् पान निसटू पाहतं.

हृदयातली सल दिसत नाही कुणालाही पण विखुरलेली पान दिसतात ज्याला त्याला. अल्पावधीत माझं आयुष्य वसंत करून जाताना, तू लांब गेल्याचं एकतरी कारण शोधत फिरतेयं मी. तू येशील या आशेने. कितीतरी ऋतू, सोहळे सहजगत्या विसरत चाललेयं मी. इथं निसर्गही माझ्यासारखा रिता होणारा. सारे पर्णहीन वृक्ष त्यांच्यासारखीच माझी जखम उघडी करून दाखवतात. तर डवरलेले वृक्ष माझ्यातल्या उणिवा मलाच दर्शवतात.  तो निघून गेल्यावर भावविव्हळ अवस्था अनुभवते तेव्हा मला जाणवते, आघाताने ओंजळीत दडलेली भविष्यातली नाउमेद पालवी आणि जाणवतो माझ्यासारखा निसर्गात असणारा जागृत, सजीव भावभावनांचा, अनुभवांचा ओलावा. अशावेळी वळणावर न स्थिरावता नवी कात टाकण्याचं निसर्गाचं कसब शिकण्यासारखं आहे. ते म्हणजे नवकांती, आकांक्षा उमलण्यासाठीची धडपड.

आजच्या घडीला माझ्या सख्याला दोषमुक्त करते मी, तो येईल या विश्वासाच्या भरवशावर. लगडलेल्या सुंदरशा मधुमालतीवर माझी नजर जाते. हलकेच स्पर्श करते मी तिला, मनातला वसंत फुलवून ठेवण्याचं भान अजूनही राखून आहे मी, पुन्हा पुन्हा बहरण्यासाठी. अंधारल्या वाटा मोठ्या असल्या तरी, किरणांच्या प्रकाशात संघर्षातूनचं नव्या दिशा मिळत लेणी आकारास येतात. हे आजवरचं सत्य स्वीकारत पुढे पुढे मार्गक्रमण करतेयं मी…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -