Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनकान्स गाजवणारी कोकणकन्या

कान्स गाजवणारी कोकणकन्या

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

कोकण ही नररत्नांची खाण आहे असं म्हटलं जातं. तिने ते वारंवार सिद्ध केलंय. आपल्या लाल मातीतली ही कन्या कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या लाल गालिच्यावर जेव्हा उभी राहते तेव्हा अंगावर अभिमानाने शहारे येतात. एव्हाना तुम्ही या कोकणकन्येला ओळखलंच असेल. फॅण्ड्री ते लापता लेडीज असा पल्ला गाठणारी आपली लाडकी अभिनेत्री छाया कदम. २०२४ हे वर्ष चतुरस्त्र अभिनेत्री छाया कदम यांच्यासाठी खास आहे. या नव्या वर्षात छाया कदम यांचे ‘लापता लेडीज’ आणि ‘मडगाव एक्स्प्रेस’ हे दोन सिनेमा प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘लापता लेडीज’मधली छाया कदम यांनी साकारलेली ‘मंजू माई’ महिलांच्या आत्मविश्वासाच्या मुद्द्यावर बोट ठेवते. रस्ता चुकलेल्या ‘फूल’मध्ये आत्मविश्वासाचा प्राण फुंकत तिला स्वावलंबी बनविते. ‘फूल’मध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी मंजुमाई म्हणजेच छाया कदम यांनी प्रत्यक्ष जीवनात ‘कान’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पदार्पण केले आहे.

पायल कापाडीया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चित्रपटाला कान या आंतरराष्ट्रीय मुख्य स्पर्धा विभागात ग्रान प्री पुरस्कार मिळाला. ३० वर्षांनंतर भारतीय चित्रपटाला ‘कान’मध्ये गौरविले गेले आहे. या चित्रपटात छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका आहे. ‘कान’मध्ये ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’च्या स्क्रिनिंगनंतर छाया कदम यांना संपूर्ण थिएटरमधील प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. चित्रपटातील त्यांच्या कामाची दखल जगभरातील मीडियानेही घेतली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा वेस्टर्न पेहराव लेवून नथ घातलेल्या फोटोचे भरपूर कौतुकही होत आहे. या कौतुकाविषयी छाया कदम सांगतात, “माझ्यातील कलाकाराला सिद्ध करण्यासाठी मी आजपर्यंत जे काही प्रामाणिक प्रयत्न केले आहेत, मला वाटतेय की त्याचेच श्रेय आहे.

‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’च्या निमित्ताने ‘कान’ महोत्सव बघता आला. चित्रपटाचा शो झाल्यावर असं काही जबरदस्त घडेल असं वाटलं नव्हतं. आपण भारताचं प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे आपण चांगलं दिसलं पाहिजे एवढंच मनात होतं. चित्रपटाच्या शोनंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजविल्या त्याने भारावून गेले. आईला खूप मिस केलं. ती, माझा भाऊ आणि बाबा जिथे कुठे असतील ते नक्कीच समाधानी असतील.

कला, अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या छाया कदम यांचा अभिनयाच्या वाटचालीचा प्रवास अतिशय खडतर आहे. छाया सांगतात, “अभिनय क्षेत्रात अपघाताने आले. अभिनयाशी माझा किंवा माझ्या घरच्यांचा अजिबात संबंध नाही. माझं बालपण मुंबईतील कालिना परिसरात गेलेय. वडील गिरणी कामगार होते. या शाळेत असताना उत्तम कबड्डी खेळायचे. त्यावेळेस पायाला दुखापत झाल्यामुळे कबड्डी खेळणे सोडले. जर आता कबड्डी खेळत असते, तर राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा नक्कीच गाजवल्या असत्या, असो.

अभिनय क्षेत्रात येण्यास कारण झाले, ते माझे बाबा आणि मोठा भाऊ. २००१ मध्ये आधी माझा भाऊ आणि त्यानंतर माझे बाबा अशी दोन जीवाभावाची माणसे अचानक मला सोडून गेली. कित्येक दिवस त्या धक्क्यात होते. एक दिवस माझी वाहिनी म्हणाली की, या धक्क्यातून बाहेर आलं पाहिजे. काहीतरी नवं केलं पाहिजे. त्यानंतर एक दिवस वाचनात प्रा. वामन केंद्रे सरांच्या अभिनय कार्यशाळेची बातमी आली. मनात आलं की, या कार्यशाळेला जाऊन तर बघूयात. त्यानिमित्ताने घराबाहेर पडणं होईल आणि काहीतरी नवीन शिकणं होईल. केंद्रे सरांची ती अभिनयाची पंधरा दिवसांची कार्यशाळा खूप काही शिकवून गेली. अभिनय क्षेत्राविषयीचे गैरसमज कुठल्या कुठे निघून गेले. पूर्वी मला असे वाटायचे की, अभिनय येण्यासाठी चांगले दिसणे, उत्तम अशी वेशभूषा-केशभूषा महत्त्वाची असते. पण केंद्रे सरांच्या कार्यशाळेत आल्यावर अभिनय म्हणजे उत्तम वाचन, बोलणे, चालणे, निरीक्षण शक्ती यांचे एकत्रीकरण असावे लागते. तसेच या सर्व गुणांच्या समन्वयातून अभिनय करणे आव्हानच असते, याची जाणीव झाली. मग ठरवले की, या क्षेत्रातच करिअर करायचं.”

छाया कदम यांच्या भूमिकांबद्दल सांगायचे झाले तर तुमच्या आमच्यातील कॉमन माणसांच्या भूमिका असतात. शिवाय त्यात वैविध्यही असते. छाया सांगतात, “मोठ्या पडद्यावर हिरो येतो, फायटिंग करतो, छान-छान कपडे घालून हिरोईन येते, हे सगळं मला कधीच आवडलं नव्हतं. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझा भवताल. माझा जन्म मुंबईचा. बालपण कालिन्यातील हाऊसिंग बोर्डाच्या कॉलनीत गेले. वडील श्रीराम मिलमध्ये काम करायचे. शाळा कालिन्यातील समर्थ विद्यालय मुलींची शाळा. बारावीपर्यंत पार्ला (आताचे साठ्ये) कॉलेजमध्ये शिकले. मग रचना संसदमधून टेक्स्टाईलचा कोर्स केला. बालपण ते जडणघडणीचा काळ हा रिअॅलिस्टिक वातावरणात गेलाय. त्यामुळे मला रिअॅलिस्टिक सिनेमांचे विषय आपलेसे वाटतात. मी इंडस्ट्रीत नसताना गजेंद्र अहिरेंचे सिनेमा भरपूर आवडायचे. ते आपले वाटायचे. मला वेगळ्या प्रकारचे सिनेमेच आवडत होते. ‘फँड्री’, ‘बाबू बँड बाजा’, ‘सैराट’, ‘रेडू’…मधून केलेल्या भूमिकांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. थोडक्यात ग्रामीण प्रेक्षक, सर्वसामान्य लोक यांच्या जीवावरच मोठी झाले आहे. छाया कदम म्हणून आणि हो अभिनेत्री म्हणूनही. एक सिनेमा आणि एक भूमिका खूप गोष्टी बदलवून टाकतात.”

आपल्या आवडत्या भूमिकांविषयी छाया कदम सांगतात, ‘फँड्री’च्या आधी अरुण नलावडे यांचा ‘बाई माणूस’ सिनेमा केला होता. त्यातली ‘झिपरी’ची भूमिका आवडती आहे. तांड्यावरची अशिक्षित ‘झिपरी’ जेव्हा पुरुषप्रधान सत्तेविरुद्ध बंड पुकारते, तेव्हा तिच्यातील आदिशक्तीच्या रूपाची झलक दिसते. ‘फॅन्ड्री’त मी माझ्या वयापेक्षा १५ वर्षांनी मोठी असणाऱ्या ‘नानी’ची भूमिका केलेली आहे. ‘फॅन्ड्री’ प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमातल्या ‘नानी’च्या आणि माझ्या वयातली तफावत प्रेक्षकांना कळली तेव्हा कित्येकांना खरेच वाटले नाही. ‘न्यूड’मधली ‘चंद्राक्का’ साकारताना विशेष अभ्यास केला. कारण सिनेमांत खऱ्याखुऱ्या ‘न्यूड’ मॉडेल्सची भूमिका साकारायची होती. ‘आक्की’च्या भूमिकेची खोली समजण्यासाठी न्यूड आर्टिस्टला जाऊन भेटले. तिचे भावविश्व जाणून घेतले. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये न्यूड पेंटिंगची दोन सेशन्स अटेंड केलीत. या अभ्यासावरच ‘अक्की’ साकारली. ‘न्यूड’च्या ‘आक्की’साठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराच्या राज्य पुरस्काराने गौरवले गेले आहे.

‘हंपी’मध्ये ‘आशाबाई’ ही लमाणी बाई साकारताना लमाणी बायकांचा पोशाख, तो परिधान करून वावरण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची ढब याचे बारकाईने निरीक्षण केले. खरे तर ही ‘हम्पी’तली लमाणी बाई सायकोलॉजिक भूमिका आहे. ती भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. ‘रेडू’मधली ‘छायग्या’सुद्धा मला विशेष आवडते. मला घरी सगळे प्रेमाने छायग्या अशीच हाक मारतात. तर ही ‘छायग्या’ साकारण्यासाठी माझ्या आईच्या व्यक्तिमत्त्वाचा बारकाईने अभ्यास केला. त्यात मी घातलेले दागिने माझ्या आईचे आहेत. शिवाय ‘छायग्या’ जी घरी मालवणी भाषा बोलते, ती आम्ही आमच्या घरी बोलतो.

‘बुधिया’मधली शिक्षणमंत्री ही भावते. कारण आतापर्यंत मी जेवढ्या भूमिका साकारल्या आहेत, त्यामधून मी जुने मळक्या, कपड्यांतून वावरलेली आहे. फक्त ‘बुधिया’मध्ये परिटघडीच्या कपड्यांमधून दिसलेली आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’मधली ‘घरमालकिणीची’ भूमिकाही माझ्या आवडीची आहे. या भूमिकेमध्ये मी फक्त अभिनयच नाही केलाय, तर मला नृत्य करण्याचीही संधी मिळाली आहे. ‘झुंड’मधली रिटायर्ड मास्तरीण बाईही भावते. कारण या भूमिकेत माझ्या तोंडी संवाद अतिशय कमी आहेत. त्यामुळे वय वर्षं ६०ची मास्तरीणबाई विविध हावभावांसहित पडद्यावर साक्षात ‘अभिनयाची पंढरी’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची सहचारिणी म्हणून साकारायला मिळणे हा मी माझा अभिमान समजते. सरला एक कोटीमधली ‘सासू’ ही मला निरागस सासूही मला आवडते. ‘लापता लेडीज’मधली ‘मंजू माई’ तर स्त्रीला स्वावलंबी आणि आत्मविश्वास पूर्वक जगायला शिकावणारी प्रेरणा आहेच. त्यामुळे मला तीही आवडते.

प्रतिभा, संवेदनशीलता, मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि अभ्यासू वृत्ती या शब्दांचा अर्क काढला आणि त्यापासून एक अजब अत्तर निर्माण झालंय… त्याचं नाव छाया कदम. अभिनयाची कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसणाऱ्या छाया कदम यांनी प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर इतकी मजल मारली आहे. आगामी काही दिवसांत ही लेडी बॉस विक्रम मेस्सीबरोबर ‘ब्लॅकआऊट’, संजय मिश्रांबरोबर ‘अल्केमिस्ट’, ‘पेडीग्री’, ‘बारडोली’ या चित्रपटांमधून आपल्या भेटीस येणार आहे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -