राजीनामा देत सांगितले ‘हे’ कारण
शेकडो कार्यकर्त्यांसह आज केला भाजपामध्ये प्रवेश
धुळे : निवडणुकीच्या रणधुमाळीत (Loksabha Election 2024) लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Constituency) काँग्रेसच्या अडचणी थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ऐन लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाला प्रचंड मोठे धक्के सहन करावे लागत आहेत. काँग्रेसचा चेहरा मानल्या जाणाऱ्या बड्या बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली असताना अशातच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस नेते तुषार शेवाळे (Dr.Tushar Shewale) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नाशिकमधील माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी आज भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश पार पडला. तुषार शेवाळे यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पक्षात (BJP) यावेळी प्रवेश केला.
काँग्रेस नेते तुषार शेवाळे हे मालेगाव लोकसभा मतदार संघातून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. मात्र काँग्रेसतर्फे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने डॉ. तुषार शेवाळे हे नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी नाशिक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर आज त्यांनी भाजपा प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
ते नेमकं काय म्हणाले?
“माझा मित्रपरिवार मोठा आहे. असंख्य कार्यकर्ते आहेत. ही सर्व मोठी ताकद मी भाजपच्या मागे उभी करणार आहे. माझी भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी पक्ष सोडला,” अशी प्रतिक्रिया यावेळी तुषार शेवाळे यांनी दिली. दरम्यान, तुषार शेवाळे यांनी अचानक काँग्रेसची साथ सोडल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे.