Wednesday, May 14, 2025

ताज्या घडामोडीरायगड

ग्रामपंचायत गैरव्यवहाराबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार - संजय जांभळे

ग्रामपंचायत गैरव्यवहाराबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार - संजय जांभळे

पेण : पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोलवी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत प्रशासकीय अधिकारी हे ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. डोलवी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत पुरावे देऊनही प्रशासकीय अधिकारी चालढकल करीत असून त्याबाबत वस्तुस्थिती मांडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.


डोलवी ग्रामपंचायत गैरव्यवहार विषय हाती घेऊन माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत तपासणी झाल्यानंतर गटविकास अधिका-यांकडे अहवाल मागविण्यात आला होता. त्यांनी अहवाल पाठविल्यानंतर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर बराच काळ निघून गेला. त्यामुळे पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी पुन्हा २०१४ च्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट एक मधील परिच्छेद दोन नुसार नियमाप्रमाणे आपल्या स्तरावर कारवाई करावी, असा आदेश २६ सप्टेंबर २०२३ रोजी पत्राद्वारे काढला. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु सौम्य कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. हा दिखावा नको तर भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. एखाद्या सामान्य ग्रामपंचायत मध्ये ३९/१ ची कारवाई त्वरीत करण्यात येते. परंतु डोलवी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही कारवाई का केली जात नाही? चौकशीच्या नावाने वेळकाढूपणा काढला जात आहे हे खपवुन घेतले जाणार नाही, असेही जांभळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


तसेच गटविकास अधिकारी कारवाई करण्यास दिरंगाई कोणाच्या दबावाखाली करत आहेत? गटविकास अधिकारी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा विसर पडलाय आहे का? असा सवाल जांभळे यांनी विचारला आहे. जो गुन्हा झाला आहे हे पुराव्यात दिसून येत आहे. याबाबत आयुक्त, मुख्य कार्यकारी, गट विकास अधिकारी यांनी चालढकल केल्याने त्यांच्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशाराही जांभळे यांनी यावेळी दिला.


यासंदर्भात पेणचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांना अनेकदा संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Comments
Add Comment