मुंबई पोलिसांनी न्यायलयामध्ये केले गौप्यस्फोट
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी (Firing) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वेगाने तपास करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या गोळीबाराचा संबंध लॉरेन्स बिश्नोईशी आहे. दरम्यान, आज दोन आरोपींना न्यायलयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी आरोपींच्या जबाबावरुन मुंबई पोलिसांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये सलमान खानच्या घरावर आरोपींना गोळ्यांचा वर्षाव करण्याची सूचना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी ५ गोळ्या फायर केल्या आणि १७ राऊंड पोलिसांनी जप्त केले. गोळीबार करून आरोपींनी पळ काढला. त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अनेकदा कपडेही बदलले. जेणेकरून पोलीस त्यांना कपड्यावरून ओळखू नयेत. त्याशिवाय, हे दोन्ही आरोपी इंटरनेटच्या माध्यमातून तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते. यासाठी आरोपींचा एक मोबाइल वायफायने जोडलेला होता.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना राज्याच्या बाहेरूनही मदत पुरवण्यात आली. यामध्ये राजस्थान, बिहार आणि हरियाणातून आरोपींना मदत पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींना मदत पुरवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
सलमान गोळीबार प्रकरणात आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.