राऊतांच्या मित्राची ७३.६२ कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई : पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) मोठा झटका दिला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने राऊतांचे जवळचे कौटुंबिक मित्र प्रविण राऊत यांची ७३.६२ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. आतापर्यंत पत्राचाळ घोटाळ्यात ११६.२७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत ईडीने पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे येथील मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने आज कारवाई केलेले प्रविण राऊत हे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र असून, प्रविण यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये गेले होते. मात्र, हे पैसे १० वर्षानंतर परत करण्यात आले. खात्यावर आलेले हे पैसे कर्ज रूपात घेतल्याचा दावा राऊतांच्या पत्नीने केला होता. त्यानंतर ईडीने राऊतांच्या मालमत्तेवरदेखील कारवाई केली होती.
प्रवीण राऊत यांचे संजय राऊत यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशी सुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात ९० कोटी रुपये हडपल्याचा आरोपही ईडीने केला आहे. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.
दरम्यान, गुरू आशिष बिल्डरने २००६ मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. त्यानंतर २००८ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. मात्र, दहा वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प पूर्ण झाला नसल्याची बाब उघडकीस आली.
एवढेच नव्हे तर, बिल्डरने मूळ ६७८ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाला १ हजार ३४ कोटींचा चुना लावला. गुरूआशिष कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून ९ त्रयस्त बिल्डरांना एफएसआय विकला आणि त्यातून ९०१ कोटी रुपये कमवले. तसेच रहिवाशांची घरेही बांधली नाहीत, असे ईडीचे म्हणणे आहे.