Wednesday, October 9, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखकाँग्रेसच्या लांगूलचालनावर मोदींचा घणाघात

काँग्रेसच्या लांगूलचालनावर मोदींचा घणाघात

अठराव्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचत आहे. मतदानाचा एक टप्पा पार पडला असून, प्रचाराला रंग चढला आहे. काँग्रेस आणि भाजपा यांच्यात मुख्य लढत असली, तरीही इंडिया आघाडीतील घटक पक्षांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपासाठी मोदी हे एकमेव ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ असून, त्यांची लोकप्रियता शिखरावर आहे. मोदी यांच्या प्रचारावर म्हणूनच देश-विदेशातील माध्यमांचे लक्ष आहे. जयपूर येथे काल एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशातील विषमता संपवण्याचे वचन दिले असल्याने, त्याचा हा अर्थ आहे की, काँग्रेस देशाची सारी मालमत्ता मुस्लिमांना वाटून टाकेल. मोदी यांच्या या आरोपात पूर्ण तथ्य आहे आणि त्यासाठी मोदी यांनीच काँग्रेसच्या काळात सत्तेवर असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे.

२००६ मध्ये सिंग यांनी या देशातील सर्व स्रोतांवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, असे वक्तव्य केले होते. काँग्रेसला अल्पसंख्यांकाचे लांगूलचालन करण्याची इतकी घातक सवय आहे की, त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसचे हे अल्पसंख्यांक प्रेम नेहरूंच्या काळापासून सुरू आहे. या देशातील मुस्लीम नाराज होतील म्हणून तर नेहरूंनी जम्मू आणि काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे विधेयक कलम ‘३७०’ रद्द केले नव्हते. केवळ शेख अब्दुल्ला यांचा हट्ट पुरवण्यासाठी नेहरूंनी कलम तसेच राहू दिले आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला सदरे रियासत म्हणजे पंतप्रधान म्हटले जात असे. स्वातंत्र्य दिनी तेथे भारताचा तिरंगा फडकवला जात नसे आणि हे काँग्रेसच्या काळातील शासन चालवणारे लोक निमूटपणे पाहत असत. त्याच मालिकेतील सिंग यांचे हे वक्तव्य होते आणि म्हणून मोदी यांनी काँग्रेसवर मुस्लिमांना संपत्ती वाटून टाकण्याचा जो आरोप केला आहे, त्यात मोदी यांचे काहीच चुकले नाही.

काँग्रेसला अल्पसंख्यांकाबद्दल इतके प्रेम वाटण्याचे कारण एकच होते की, मुस्लीम काँग्रेसला एक गठ्ठा मतदान करत. कालांतराने हे कमी झाले. पण खरे तर काँग्रेसच्या अतिरेकी मुस्लीमप्रेमामुळेच भाजपाला देशात फार मोठा अवकाश मिळाला आणि भाजपा सत्तेत आला. काँग्रेसला अल्पसंख्यांक प्रेमाचा इतका उमाळा येत असे की, हिंदूंच्या प्रत्येक सणाला सुट्टी दिली जात नसे. मात्र अल्पसंख्यांकांच्या सणाला आवर्जून सुट्टी दिली जात असे. पण त्याहीपेक्षा काँग्रेसचे अल्पसंख्यांक प्रेम इतक्या भयंकर थराला गेले की, इस्लामी दहशतवादाला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसचे केंद्रीय मंत्री राहिलेले चिदंबरम यांनी ‘भगवा दहशतवाद’ हा नवाच शब्द शोधून काढला होता. भगवा दहशतवाद हा इस्लामी दहशतवादाला उत्तर आहे, असे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. दहशतवादाची धर्माच्या आधारावर फाळणी करण्याचे पाप काँग्रेसने केले आणि तेही अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी.

धर्माचा आपल्या राजकारणासाठी इतका वापर करणारा काँग्रेससारखा पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल. अल्पसंख्यांक नाराज होऊ नयेत म्हणून काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रणही ऐनवेळी धुडकावून लावले. त्यामुळे किती अल्पसंख्यांकांच्या मतांची बेगमी झाली, ते लोकसभा निकालानंतर समजेलच. काँग्रेसने याचसाठी इतके दिवस समान नागरी कायदा लागू केला नाही. वास्तविक समान नागरी कायद्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. तो देशातील लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा मुद्दा होता. पण काँग्रेसने त्याचा संबंध अल्पसंख्यांकाशी जोडला आणि मुस्लिमांना सातत्याने समान नागरी कायद्याची भीती दाखवत, त्यांची मते घेत राहिला. एमआयएमशी काँग्रेसने युती केली आणि नगरपालिकांत जागा मिळवल्या. हिंदू बॅकलॅशची भीती काँग्रेसला कधीच वाटली नाही. कारण त्यांना माहीत होते की, हिंदू एकगठ्ठा मतदान करत नाहीत आणि मुळात मतदानच करत नाहीत. त्यामुळे देशात सारे अल्पसंख्यांकांसाठीच चालले आहे की काय, असे वातावरण तयार झाले होते.

काँग्रेसच्या काळात तर हिंदू असल्याचे सांगण्याचीही भीती वाटत असे. पंतप्रधानपदी मोदी आल्यावर, परिस्थिती खूपच बदलली आणि आता या देशात हिंदूंनाही काही स्थान आहे, हे पटायला लागले आहे. काँग्रेसने ‘सीएए’ला विरोध यासाठीच केला की, त्यामुळे इतर देशांत इतर धर्मीयांच्या अत्याचाराच्या घटनांचे शिकार झालेले हिंदू भारतात आसरा घेऊ शकतील, हे काँग्रेसच्या मुस्लीम लांगूलचालनाच्या धोरणात बसत नव्हते. मोदी यांनी एका वाक्यातच काँग्रेसच्या आतापर्यंतच्या धोरणाचे सार सांगितले आहे. मोदी यांनी लोकांनी काँग्रेसच्या या भ्रामक प्रचारापासून अलग राहावे, याचा गर्भित इशारा दिला आहे. लव्ह जिहादच्या प्रकारांना काँग्रेस म्हणूनच आक्षेप घेत नाही. मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी, जी इंडिया आघाडी नावाचे एक कडबोळे तयार केले आहे, त्यातील विरोधाभास निवडणूक प्रचार सभेतच दिसून येत आहे.

काँग्रेस आणि राजद हे दोघेही इंडिया आघाडीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रांची येथील सभेत एकमेकांचे गळे पकडले. ज्या आघाडीचे घटक पक्ष एकमेकांचे कपडे निवडणुकीअगोदरच फाडत आहेत, ते सत्तेवर आल्यावर देशाची काय अवस्था करतील, याचा विचार केला पाहिजे. बिहारमध्ये एका प्रचारसभेत राजदच्या कार्यकर्त्याने तेजस्वी यादव यांच्या आईवरून शिवी दिली. त्या सभेला चिराग पासवान उपस्थित होते. राजदच्या कार्यकर्त्यांची हीच संस्कृती आहे. तीच इंडिया आघाडीत समोर आली आहे. वास्तविक आई हो कुणाचीही असो, चिराग पासवान यांची असो की तेजस्वी यादव यांची असो, ती श्रेष्ठच असते! पण राजद कार्यकर्त्यांना इतके भान कुठले राहायला. अशी संस्कृती असलेली आघाडी मोदी यांना हटवण्याचे स्वप्न पाहत आहे. मोदी यांनी जो हल्लाबोल केला, त्यात त्यांनी वास्तवच समोर आणले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -