Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीRam Satpute : 'मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत फेटा बांधणार नाही'

Ram Satpute : ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत फेटा बांधणार नाही’

भाजपा आमदार राम सातपुतेंचा संकल्प

सोलापूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच सोलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजपा आमदार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचारसभांचा धुमधडाका पाहायला मिळत आहे. रविवारच्या भगवान महावीर जयंती निमित्त सोलापुरात जैन बांधवांकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम सातपुते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचे विधान केले आहे.

‘जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही,’ असा संकल्प सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे. लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना सातपुते यांनी आपली भावना व्यक्त केली.

राम सातपुते यांचा काँग्रेसवर आरोप

“मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांसमोर मी संकल्प केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अथवा मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी फेटा घालणार आहे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

“हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची फैयाज शेख नामक जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली. या घटनेचा मी निषेध करतो. तसेच मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मशिदीतून फतवे काढून संविधानाला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत,” असा आरोपही यावेळी राम सातपुतेंनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -