मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे (Bandra) येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवार, १४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला. या बातमीने सर्वत्र गोंधळ पसरला होता. सध्या या घटनेबाबत पोलीस तपास सुरु असून सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. घरावरील गोळीबाराच्या बातमीनंतर सलमान नुकताच परदेशात रवाना झाला आहे.
सोशल मीडियावर सलमान खानचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी सलमान कडक सुरक्षेसह गाडीतून उतरत विमानतळाकडे जाताना दिसला. रविवारी झालेल्या गोळीबारानंतर सलमान त्यांच्या सुरक्षारक्षकांसह काही वेळासाठी बाहेर पडला होता पण थोड्यावेळात तो परतला. त्यानंतर इतक्या दिवसाने कामाच्या निमित्ताने तो परदेशात रवाना झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका लक्झरी प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी तो दुबईला गेला आहे.
सलमानचा २०२५ मध्ये सिकंदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलमानने या सिनेमाची घोषणा केली होती. साजिद नादियाडवाला या सिनेमाची निर्मिती करत असून ए आर मुरुगादास या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. पुढच्या वर्षी रमजान ईदला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
दरम्यान, सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या सागर पाल आणि विकी गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी कोठडीत केली आहे. हे हल्लेखोर फक्त सलमानच्या मुंबईतीलच नाही तर पनवेलमधील घरावरही पाळत ठेवून होते. सलमानकडून खंडणी घेण्याच्या उद्देशानेच त्याला धमकी देण्यासाठी हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून या प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेल्या गँगस्टर लॉरेंस बिष्णोईची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच सलमानच्या घरावरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.