मुंबई : काही दिवसांपूर्वी उबाठाचे अतिशय जवळचे सहकारी मानले जाणारे नेते रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उत्तर पश्चिम लोकसभेची जागा महाविकास आघाडीत उबाठा गटाला सुटली आहे. तिथे उबाठाचे उमेदवार अमोल कीर्तिकर निवडणूक लढवत आहेत.त्यांच्याविरोधात आता रवींद्र वायकर हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेटीमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.
तसेच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. पूनम महाजनांचा पत्ता कट करुन उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. त्यांनी २६/११ हल्ल्याची केस लढवली होती.
त्यांनी कोर्टात युक्तिवाद केल्यामुळे दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा झाली. त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या रुपाने मोठा चेहरा भाजपकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या मतदारसंघातील सध्याच्या खासदार पूनम महाजन या दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत.