
रुग्णवाहिकाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले दुचाकीस्वाराचे प्राण
मुरूड : मुरूड तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्या धोकादायक ठरत आहेत. या साईडपट्ट्या न भरल्यामुळे दुचाकी अपघातात वाढ होत असून नुकताच एका दुचाकीस्वाराचा जीव जाता जाता वाचला आहे. या नवीन रस्त्याच्या साईडपट्ट्या लवकरात लवकर भरण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.
सावळा ते मुरूड व मुरूड ते आगरदांडा रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम जोरदार चालु आहे. परंतु हे रस्ते करत असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्या ६ इंचापेक्षा जास्त खोल झाल्याने धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे दिवसाला एक तरी अपघात होतो आहे. या रस्त्यांचे काम करत असताना ताबडतोब साईडपट्ट्या भरणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ होत आहेत.
नुकताच मुरूड आगरदांडा रस्त्यावर दुचाकीस्वाराचा प्राण रुग्णवाहिका चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाचला. आगरदांडा येथील रुग्णवाहिकेचे चालक निकेतन सुर्ते रुग्णवाहिका घेऊन मुरूडच्या दिशेने येत होते. आगरदांड्याच्या दिशेने जात असलेला दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी साईड पट्टीवर उतरत असताना या खोल साईडपट्टीमुळे दुचाकी घसरली व दुचाकीस्वार रुग्णवाहिकेच्या चाका खाली येत असताना रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधानतेने रुग्णवाहिका थांबवून प्राण वाचविले आहे.
हे बनविलेले रस्ते अरुंद असल्याने अचानक मोठी गाडी आली की दुचाकीस्वारांना रस्त्याच्या खाली उतरावे लागते. पण या साईड पट्ट्या ६ ते ८ इंच खोल असल्याने दुचाकी घसरून अपघात होतात. तरी या साईड पट्ट्या लवकरात लवकर भरण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.