सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात चाचपणी, आढावा घेण्यासाठी, गाठीभेटी आणि संवाद साधण्याच्या निमित्ताने काँग्रेसला (Congress) कोंडीत पकडायला गेलेल्या उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखिल कोणताही प्रतिसाद न देता राऊतांना अक्षरश: उताणी पाडले. यामुळे सैरभर झालेल्या राऊतांनी सांगलीतून निघता निघताना आपल्याच मित्रपक्षांवर टीका करुन स्वत:च्या पायावर धोंड पाडून घेतल्याची सांगलीत जोरदार चर्चा आहे.
त्याचे झाले असे की, सांगली लोकसभा मतदारसंघात चाचपणीसाठी, आढावा घेण्यासाठी, गाठीभेटी आणि संवादासाठी आलो आहे. पुण्या-मुंबईतील पथक घेऊन आलोय… असे म्हणत खासदार संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याची सुरुवात झाली. पण दौरा संपला तेव्हा राऊतांनी काळवेळ न पहात प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपल्याच मित्रपक्षांवर टीका केली.
सांगलीत येऊन वसंतदादा पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करत राऊतांनी वाद ओढावून घेतला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांबद्दल विविध दावे करुन त्यांना नाराज केले. आजी-माजी आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या पण एकाचाही पाठिंबा मिळविण्यात ते सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे ज्या उद्देशाने राऊत सांगलीत आले होते, तो उद्देशच राऊतांना साधता आला नाही. त्यामुळे आगडोंब झालेल्या राऊतांचा तोल सुटला आणि त्यांनी आपल्याच मित्रपक्षांवर टीकेचा भडीमार केला.
उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊत सांगलीच्या जागेबाबत इरेला पेटले आहेत. ठाकरेंनी तर दिल्लीतच सांगितले की आमच्यासाठी जागावाटप संपले आहे. आता २०२९ मध्ये पाहू. पण काँग्रेसच्या विशाल पाटील, विश्वजित कदम या नेत्यांनी दिल्ली, मुंबई, नागपूर जिथे जशी जमेल तशी चर्चा करतच राहिले. हे पाहून संजय राऊतांनी सांगलीचा दौरा आखला. सांगलीसारख्या शहरात राऊतांनी तीन दिवस तळ ठोकल्याने सांगलीसाठी ठाकरे गट एवढा आग्रही का? ते देखील सात दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या उमेदवारासाठी एवढा आटापीटा का? असे अनेक प्रश्न पडू लागले. त्यामुळेच या दौऱ्यातून राऊत काय साधतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
राऊत सांगलीमध्ये आले. त्यांना या दौऱ्यात सर्व महाविकास आघाडी एकत्र आहे, असे दाखवायचे होते. पण त्यांना ते साधता आले नाही. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अरुण लाड वगळता एकही विद्यमान आमदाराने राऊतांना भेट दिली नाही. सांगलीत शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची ताकद राऊतांना चंद्रहार पाटील यांच्यामागे उभी करायची होती. त्यासाठी ते तासगावमध्ये आर. आर. पाटील यांच्या स्मृतीस्थळी गेले. कडेगावला सोनहिरा कारखान्याजवळ पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी गेले. तिथे देखिल राऊतांना कोणीच भेटले नाही.
विश्वजीत कदम, विक्रम सावंत, सुमन पाटील अशा स्थानिक आमदारांची आणि राऊतांची भेट झालीच नाही.
विलासराव जगताप, अजितराव घोरपडे अशा माजी आमदारांना राऊतांनी चुचकारण्याचा प्रयत्न केला. पण हे नेतेही राऊतांच्या गळाला लागले नाहीत. घोरपडे यांनी राऊतांना टिपिकल राजकीय उत्तर दिले. “तुमचं काय ठरल्याशिवाय आम्ही कसं काय सांगायचं? आजपर्यंत अपक्ष म्हणून निवडून आलोय. कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन, त्यांचे विचार घेऊन आम्हाला ‘डिक्लेर करावे लागेल. असे एकतर्फी करता येणार नाही” असे म्हणत घोरपडेंनी राऊतांचा विषय संपवला.
तर “चंद्रहार पाटील हा सक्षम उमेदवार नव्हे. तो नवखा आहे. तुमच्या पक्षाचे नेटवर्क खूप कमी आहे. तुमचा पक्ष फुटला आहे. त्यामुळे दहा तालुके, सहा विधानसभा मतदारसंघात यंत्रणा राबविणे तुमच्यासाठी सोपी गोष्ट नाही. दोन हजार दोनशे बुथ आहेत. त्यामुळे विशाल हा शंभर टक्क्के पर्याय होऊ शकतो. त्याच्याच नावाचा विचार करायला हरकत नाही. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना शिवसेनेला, बाळासाहेबांना ताकद दिली. त्याच दादा घराण्यातील उमेदवाराला, दादांच्या नातवाला तुम्ही कॉर्नर करत आहात. यासारख्या सर्वच गोष्टींचा जरा विचार करा” असे खडे बोल विलास जगताप यांनी राऊतांना सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी देखिल या दौऱ्यापासून चार हात लांब होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आपल्यासोबत आहे, असे सांगणाऱ्या राऊत यांच्याकडे पवार गटातील कोणीही फिरकले नाही. सांगली शहरात आणि तासगावमध्ये पवार गटाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राऊतांचे पाहुणे म्हणून स्वागत केले. पण महायुती म्हणून राऊतांना पाठिंबा मिळवता आला नाही. त्यातूनच आगडोंब झालेल्या राऊतांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली.
सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल, तर त्यांची राज्यभरात कोंडी होईल हे लक्षात ठेवावे अशी धमकीच राऊतांनी दिली. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी. त्यांनी महाविकास आघाडीच्या परिवर्तनामध्ये सामील व्हावे; अन्यथा जनता माफ करणार नाही, असा इशारा देखिल दिला.
तरीही काँग्रेस आणि पवार गटाकडून मिळणारा नकारात्मक प्रतिसाद पाहून राऊतांचा संयम सुटला. त्यातूनच त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जाऊन काँग्रेसलाच अंगावर घ्यायला सुरुवात केली. वसंतदादा पाटील यांचा सहकार सम्राट असा उल्लेख केला. विशाल यांचे पायलट असलेल्या कदमांचे विमान गुजरातकडे भरकटणार नाही, याची काळजी घेऊ असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यांनी काँग्रेस एकवटली. रातोरात निषेध पत्रक काढण्यात आले. त्यानंतरही राऊत थांबण्याचे नाव घेत नव्हते.
सांगलीतील इस्लामपूर असो अगर कडेगाव, पलूस इथल्या नेत्यांनी त्या त्या ठिकाणी आपले संस्थान उभारले आहे. साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्था वाचवण्यासाठी, स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही मंडळी भाजपसोबत हातमिळवणी करत आहेत. त्यातूनच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून काही नेत्यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत, अशी विधाने राऊतांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी राऊतांना जाहीर निषेध व्यक्त केल्याने राऊतांना महाविकास आघाडी म्हणून सांगलीतून पाठिंबा मिळविण्यात सपशेल अपयश आले.
दरम्यान, राऊतांच्या सांगली दौ-याच्या तोंडावरच सांगलीची उमेदवारी मित्रपक्षांना विश्वासात न घेता जाहीर झाली आहे, असे शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वाक्यामुळे चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, हा संजय राऊतांचा दावा फोल ठरला. काँग्रेसचा पाठिंबा नाही, पवारांचा पाठिंबा नाही, मग चंद्रहार पाटील केवळ ठाकरेंचे उमेदवार ठरले. याबद्दल त्यांना विचारल्यावर त्यांनी थेट बोलणे टाळले. पण भिवंडीची उमेदवारीही एकमताने झालेली नाही, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत, असे म्हणत पवारांना डिवचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
अखेरीस सांगलीतून निघता निघताना राऊतांनी “ते बरोबर असोत वा नसोत, आम्ही एकटे लढू” असे म्हणून काँग्रेस आणि पवार गटाच्या नेत्यांना फटकारले.
सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात असतानाच उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये धूसफुस सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून आग्रह धरला जात आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच विश्वजित कदमांसह विशाल पाटलांनी दिल्लीत काँग्रेसच्या हाय कमांडची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. मात्र, अद्याप सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसच्या हाय कमांडच्या नेत्यांकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…