भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


प्रत्येक मनुष्य बोलताना ‘मी’ आणि ‘माझे’ अशा भाषेत बोलत असतो; म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतींत काही कर्तव्ये असतात. ‘माझे’ या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात ‘मी’ चे कर्तव्य परमेश्वरप्राप्ती हे आहे; आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीती यांना धरून, संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो; म्हणजेच, ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. ‘कर्तव्य’ याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे, असा आहे. मनुष्याने ‘मी’ आणि देह या दोहोंच्या बाबतींतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे.


‘मी’ चे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन, असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की, समजा, एखादा मनुष्य नोकरी करीत आहे; तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की, ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंब रक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा, त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही, तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे, ‘मी’ चे कर्तव्य, म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले, पण देहाचे कर्तव्य, म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तींशी असलेली कर्तव्ये न केली, तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी; आणि या द‍ृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन, प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा, त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम
घ्यावे; म्हणजेच, आपण आत-बाहेर गोड असावे.


ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो, पण शेवटी समेवर येतो, त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे; म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे, म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून, म्हणजेच त्याच्या स्मरणात, जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल.


तात्पर्य : फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय.

Comments
Add Comment

ठरलं तर ! इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात होणार 'या' महाराजांचे कीर्तन

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार

श्रद्धा की अंधश्रद्धा?

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या घडणीत ‘श्रद्धा’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

आत्मतेजाचा निनाद अंतरी सद्गुरूंचा नाद

ऋतुराज : ऋतुजा केळकर “वाऱ्याच्या लयीसंगे विवेक जागतो... स्मरणातल्या सुरांनी मन शुद्ध होतं... सद्गुरूंच्या कृपेने

मनुष्य जन्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आपण सध्या प्रबोधनासाठी घेतलेला विषय म्हटला तर अत्यंत कठीण आहे. म्हटले तर खूप

ज्ञानाचा सोपान

भारतीय संत : डॉ. अनुराधा कुलकर्णी निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या नावाची संगती

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि