ऋतुराज : ऋतुजा केळकर
“वाऱ्याच्या लयीसंगे विवेक जागतो...
स्मरणातल्या सुरांनी मन शुद्ध होतं...
सद्गुरूंच्या कृपेने अहंकार विरतो...
सत्त्वगुणांच्या तेजात आत्मा उजळतो...”
मृगजळातील देवचाफ्याचा अचानक गंध वातावरण सुगंधित करावा तसे काहीसे शब्द माझ्या मनाच्या दर्पणात प्रतिबिंबित झाले आणि मन दुधारी बंदिशी सारखे विभोर झाले. जसा वाऱ्याचा मंद झुळुक पानांच्या थरथरीतून एक गूढ लय निर्माण करतो, तसा विवेक मनाच्या गाभ्यात हलकेच जागृत होतो. त्या लयीला साथ देणारे सूर म्हणजेच ‘भगवंताचे स्मरण’ जे मनाला शुद्ध करतात, जणू एखाद्या नदीच्या प्रवाहातले स्वच्छ पाणी. त्या शुद्धतेला दिशा देणारा स्पर्श म्हणजे सद्गुरूंचा अनुग्रह. तो अनुग्रह अहंकाराच्या खड्यांना वितळवतो, ममत्वाच्या मातीला दूर सारतो आणि विकारांच्या पाकडांना भस्म करतो. ‘पाकड’म्हणजे धान्यात किंवा अन्नधान्यात मिसळलेले कचरा, तूस, गवताचे तुकडे, धान्याला न लागणारे तुकडे. ‘सद्गुरूंचा अनुग्रह’ विकारांच्या पाकडांना भस्म करतो म्हणजे साधनेत जे अनावश्यक, अशुद्ध, आत्मविकासाला अडथळा ठरणारे घटक आहेत ते सद्गुरूंच्या कृपेने नष्ट होतात. जसं शेतकरी धान्यातील पाकड वेगळं करून शुद्ध धान्य ठेवतो, तसं साधकाच्या जीवनात सद्गुरूंचा अनुग्रह विकारांना दूर करून आत्मतेज शुद्ध ठेवतो. म्हणूनच सद्गुरूंचा अनुग्रह फक्त सत्त्वगुणांचे तेज जे आत्म्याला उजळवते, जणू पहाटेच्या सूर्यकिरणांनी अंधार दूर व्हावा तसे.
पण या अनुभूतीचा विस्तार इथेच थांबत नाही. विवेक हा केवळ विचारांचा प्रकाश नसतो, तो मनाच्या प्रत्येक कोपऱ्यातील अंधाराला हळूहळू दूर करणारा दीप असतो. जसा समुद्राच्या लाटांमध्ये एक अदृश्य लय असते, तशीच विवेकाची लय मनाला स्थिरतेकडे नेते. भगवंताचे स्मरण हे त्या लयीला स्वर देते जणू, वाद्याच्या तारा सूर धरतात आणि जीवनाचे संपूर्ण सभागृह निनादित होतं. त्या स्मरणात मन देखील विशुद्ध होतं, जणू पावसाच्या पहिल्या थेंबांनी धुळीने झाकलेली पाने पुन्हा हिरवी होतात.
सद्गुरूंचा अनुग्रह हा केवळ स्पर्श नाही, तो साधकाच्या जीवनात एक अदृश्य प्रवाह निर्माण करतो. जसा आकाशातला सूर्य ढगांच्या आड लपला तरी त्याचा प्रकाश पृथ्वीला पोसतो, तसा सद्गुरूंचा कृपाप्रवाह साधकाच्या प्रत्येक क्षणाला स्थैर्य देतो. अहंकार हा जणू बर्फाचा डोंगर असतो कठीण, थंड आणि जड. पण सद्गुरूंच्या कृपेच्या उष्णतेने तो हळूहळू वितळतो आणि मनाचा समुद्र पुन्हा शांत होतो. ममत्व ही जणू वेली असते, जी मनाला घट्ट गुंफून ठेवते, पण सद्गुरूंच्या स्पर्शाने ती वेल सैल होते आणि साधकाला मुक्त श्वास घेता येतो. विकार हे जणू धुक्यासारखे असतात, जे आत्मतेजाला झाकून टाकतात, पण सद्गुरूंच्या प्रकाशाने ते धुके विरघळते आणि आत्म्याचे नितळ आकाश उलगडते आणि मग उरते ते सत्त्वगुणांचे तेज की जे आत्म्याला उजळवते, जणू रात्रीच्या आकाशात अचानक उमललेला पूर्णचंद्र बनवते. सत्त्वगुण हे केवळ गुण नसतात, ते आत्म्याचे तेजस्वी प्रतिबिंब असतात. जसा स्वच्छ तलावात आकाशाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते, तसा सत्त्वगुणांनी भरलेला आत्मा स्वतःचं खऱ्या अर्थाने दर्शन घडवतो. त्या दर्शनात साधकाला शांती मिळते, समाधान मिळते, आणि आत्मतेजाचा निनाद मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात गुंजू लागतो.
सद्गुरूंचा अनुग्रह हा केवळ क्षणिक स्पर्श नसतो, तो साधकाभोवती एक सूक्ष्म रक्षणवलय विणतो. जसा आकाशातला चंद्र आपल्या शीतल प्रकाशाने अंधाराला दूर सारतो, तसा सद्गुरूंचा कृपाप्रवाह साधकाच्या जीवनातील विकारांना हळूहळू विरघळवतो. त्या रक्षणवलयात साधकाला एक अदृश्य आधार मिळतो, जणू वादळातही झाडाच्या मुळांना धरून ठेवणारी पृथ्वी. पण, या कृपाशक्तीचा खरा अर्थ साधकाने गुरूला एकनिष्ठतेने शरण गेल्यावरच उमगतो. अनेक मार्ग, अनेक गुरू यांचा गोंधळ बाजूला सारून ‘एक गुरू, एक साधन’ या भावनेत स्थिर राहणे म्हणजेच साधनेचा पाया. नामस्मरण हे त्या निष्ठेचे मूळ आहे ज्यामुळे मनात ‘मी त्यांचा आहे’ अशी भावना घट्ट रुजते.
मी अस मुळीच म्हणत नाही की इतर संतांविषयी आपल्या मनात अनादर ठेवावा, पण आपल्या सद्गुरूंशीच अनन्य राहणे हे साधनेचे रहस्य आहे. जसा नदीला एकच किनारा दिशा देतो, तसा सद्गुरूंचा अनुग्रह साधकाला स्थैर्य देतो. त्या स्थैर्यात साधकाला शांती मिळते, समाधान मिळते.
अहंकार, ममत्व आणि विकार हे जणू मनाच्या शेतातले काटेरी गवत असतात. ते वाढत राहतात आणि आत्मतेजाच्या अंकुराला झाकून टाकतात. साधक कितीही प्रयत्न करीत राहिला तरी हे गवत पुन्हा पुन्हा उगवतं, कारण त्याची मुळे खोलवर रुजलेली असतात. पण सद्गुरूंच्या कृपाशक्तीने जेव्हा साधक त्या गवताला उपटून टाकतो, तेव्हा उरते ती शुद्ध भूमी जिथे सत्त्वगुणांचे बीज अंकुरते.
अहंकार हा खड्यासारखा कठीण असतो, ममत्व ही जड माती असते आणि विकार हे धुक्यासारखे आच्छादन असतात. हे सर्व दूर झाले की आत्म्याच्या गाभ्यात एक नितळ तेज प्रकटते. ते तेज साधकाला केवळ शांतीच देत नाही, तर जीवनाला नवी दिशा देते. जणू पहाटेच्या सूर्यकिरणांनी रात्रीचा अंधार वितळावा तसे, आत्मतेजाचा प्रकाश मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरतो. त्या तेजात साधकाला समाधान मिळते, अंतःकरणात स्थैर्य निर्माण होते आणि आत्मतेजाचा निनाद अंतरी गुंजू लागतो. हा निनाद केवळ साधकापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याच्या जीवनातून इतरांपर्यंतही पोहोचतो. जसा दीप स्वतः उजळतो आणि सभोवतालचा अंधारही दूर करतो, तसा साधकाचा आत्मतेज इतरांच्या जीवनातही प्रकाश पसरवतो.