Saturday, August 30, 2025

सृजनशील अभिव्यक्तीसाठी...

सृजनशील अभिव्यक्तीसाठी...

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

वर्गातल्या संवादात मी मुलांना प्रश्न विचारला, “एका कवितालेखनाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे पत्रक आले आहे. कोण कोण भाग घेणार आहे?” वर्गात शांतता नि नंतर एखाद्-दुसराच हात वर. सर्वच हात वर व्हायला हवे होते, असे मला म्हणायचे नाही. पण हा जाणीवपूर्वक ‘मराठी साहित्य’ या विषयाची निवड केलला वर्ग होता. मला जाणवले की, लहानपणापासून कविता या प्रकाराशी या मुलांचे नाते जुळलेले नाही. शालेय अभ्यासक्रमातील कवितांपलीकडे मुलांनी फारशा कविता वाचलेल्या नाहीत.

कविता समजून घेणे, नाटक समजून घेणे याकरिता बालपणापासून मुलांना ज्या संधी दिल्या जायला हव्यात, त्या त्यांना मिळत नाहीत. मुलांनी परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करावे, हा पालकांचा ध्यास असल्याने तेच आपसूक मुलांचेही ध्येय होते. मुलांची अभिव्यक्ती क्षमता विकसित होणे, त्यांच्या सृजनशीलतेची जडणघडण होणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही. या दोहोंकरिता नवीन व वेगळा विचार करण्याची सवय, व्यक्त होण्याची ओढ, विचारांची स्पष्ट मांडणी, कुतूहल, जिज्ञासेतून प्रश्न विचारायची सवय या गोष्टी आवश्यक आहेत. या सर्व गोष्टी मातृभाषेच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे घडू शकतात. मुलांची सृजनशीलता विकसित होण्यात पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते.

एक गच्च भरलेला वर्ग. शिक्षकांचा रुक्ष आवाज. शब्दाला शब्द जोडत शिक्षक कविता शिकवत आहेत. मुले नीरसपणे कंटाळत सर्व ऐकत आहेत. “आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे...” बाहेर खिडकीतून दिसणारे आकाश, सप्तरंगी इंद्रधनुष्य, ओल्या गवतावर उडणारी फुलपाखरे हे दृश्य मुलांना डोळ्यांत साठवायचे आहे, पण मुलांचे लक्ष एकसारखे बाहेर जात असल्याने शिक्षक थेट खिडकीच बंद करून टाकतात. बाहेर कविता फुलत असते नि आत मुले कोमेजून जातात.

हे दृश्य शिक्षणाचा मौल्यवान पाठच शिकवते. कविता लेखनाकरिता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांचा अमाप खजिना. पालकच अलीकडे मुलांना शिक्षणाच्या नावाखाली आपल्या भाषेतून तोडत असल्याने त्यांच्याकडचा शब्दसाठा तोकडा राहतो. साहजिकच त्यांच्या अभिव्यक्तीला मर्यादा येतात. मातृभाषेचे देणे अमर्याद आहे. तिच्यापासून मुलांना दूर ठेवून कसे चालेल?

Comments
Add Comment