Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमुलीचा अधिकार

मुलीचा अधिकार

क्राइम: ॲड. रिया करंजकर

मुंबईमध्ये सरकारच्या नवीन नवीन योजना चालू आहेत. मुंबई अजून सुंदर कशी वाटेल, याकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे मुंबईचे रूपडे बदलण्याचे काम सरकार करत आहे. यासाठी मुंबईतील झोपडपट्टी ही एसआरएद्वारे डेव्हलप केली जात आहे. ब्रिटिशकालीन जुन्या बीडीडी चाळी येथे टोलेजंग इमारती उभ्या केल्या जात आहेत. तसेच जुन्या इमारती या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यात येत आहेत. या बनवत असताना अनेक कुटुंबीय हे एकत्र राहत असतात. त्यामुळे प्रॉपर्टीसाठी वादविवाद होऊ लागले आहेत. काहींनी रूम आपल्या नावावर करून घेतलेले आहेत. तरीही काही ठिकाणी अजून वडिलांच्या नावावर आहेत व त्यांना चार मुले आहेत, असे प्रॉब्लेम आता समोर येऊ लागले आहेत.

शिवराम गेल्यानंतर ती रूम त्यांच्याच नावावर होती. त्यांना चारही मुलगे होते. त्याच्यातील मोठा मुलगा हा त्या बीडीडीच्या रूममध्ये राहत होता व बाकीच्या लोकांनी रूममध्ये जागा नाही म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी प्रशस्त फ्लॅट विकत घेऊन तिथे ते राहत होते. मोठा मुलगा सुशील हा आपली पत्नी व मुलगी प्रीतीसह तिथे राहत होता. स्वतःच्या नावावर करून घ्यायचं, तर बाकीच्या भावंडांना पैसे द्यावे लागतील. आपल्याला राहायला मिळते ना, हा तो विचार करत होता. बाकीचे भाऊही राहतोय ना तो, तर राहू दे, असा विचार करत होते.

प्रीती मोठी झाल्यानंतर सुशीलने तिचं लग्न केलं आणि आता नवरा-बायकोच तिथे राहत होते. कालांतराने सुशीलची पत्नी वारली. सुशील आपल्या मुलीकडे येऊन-जाऊन राहत होता आणि एक-दोन वर्षांत सुशीलही गेला. एकटी फक्त मुलगीच राहिली कारण, ती एकुलती एक मुलगी होती. तोपर्यंत तिथे त्या रूमला टाळेच लावलेले होते. कारण सुशीलचे तिन्ही भाऊ हे प्रशस्त घरांत राहत असल्याने तिथे कोणीही राहायला आलं नाही आणि ज्यावेळी त्या चाळीला बिल्डर आला, त्यावेळी या तिघा भावांनी मिळून आपला हक्क त्याच्यावर दाखवला आणि आम्ही तिन्ही भाऊ या घराचे वारसदार आहोत, असे पेपर त्यांनी सरकारी अधिकाऱ्याकडे जमा केले. या गोष्टीची खबर त्यांनी प्रीतीला दिली नाही.

ज्यावेळी प्रीतीला हे समजलं, तेव्हा ती सरकारी अधिकाऱ्यांना भेटायला गेली आणि यांचा मोठा भाऊ सुशील याची मी मुलगी आहे आणि माझे आई-वडील दोघेही आता नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यानंतर माझा अधिकार येतो, असं तिने त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. तो अधिकारी तिला उलट बोलू लागला, तू लग्न करून गेलेली मुलगी आहे. त्यामुळे तुझा आता अधिकार काही राहिलेला नाही. तू यांना एनओसी दे आणि निघून जा. अशा वरच्या आवाजात प्रीतीला ओरडू लागला. प्रीतीने विचारलं, लग्न केल्यानंतर मुलींचा अधिकार नसतो का? तर त्यांनी सरळ नाही असं उत्तर दिलं.

प्रीतीच्या काकांनी आम्हाला एक भाऊ होता आणि त्याची एक मुलगी आहे हे त्या अधिकाऱ्याला दाखवलंच नाही असं नाही, तर त्याच अधिकाऱ्याने काहीतरी घेऊन आपण हिला बेदखल करायचं असं त्यांना सुचवलं असणार. त्याशिवाय ती मुलगी तिथे हजर झाल्यावर तो ओरडला नसता. सुशीलच्या भावांनी आपल्यात अजून एक हिस्सेदार नको म्हणून तिचं नावच तिथे घेतलं नव्हतं. प्रीतीने वकिलांचा सल्ला घेतला आणि असं ठरलं की जिथे चाळीचे पेपर ज्या अधिकाऱ्याकडे गेले आहेत, तिथेच आपलेही अधिकार आहेत, तर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीत अधिकार असतो. या अधिकाराच्या जोरावर आपण तिथे अधिकार घ्यायचा व बाकीच्या चुलत्यांनी जे पेपर सादर केलेले आहेत ते थांबवायचे व त्यांनी हे फसवून सगळे कागदपत्र जमा केलेले आहेत, हे कोर्टामध्ये दाखवायचं.

समाजामध्ये अजूनही वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा अधिकार असतो, हे स्वीकारलं गेलंच नाहीये. तिला भाऊ नव्हता. ती एकुलती एक होती. जर भाऊ असता, तर तिला प्रॉपर्टी दिली असती का तिच्या काकांनी? ही एकुलती एक आणि लग्न करून गेली म्हणून तिला तिच्या आई-वडिलांची प्रॉपर्टी तिच्या चुलत्याने का नाकारली? त्यांना माहीत होतं की मुलीचा अधिकार असतो. पण तिला अंधारात ठेवून तिचा हिस्सा त्यांना घ्यायचा होता, हे मूळ कारण होतं. (सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -