नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १९५ नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता काँग्रेसही लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यात अनेक नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते.
भाजपप्रमाणेच काँग्रेसच्या पहिल्या यादीत अनेक दिग्गजांची नावे असतील. असे मानले जात आहे की काँग्रेसच्या पहिल्या यादीत पक्षाचे माजी प्रमुख राहुल गांधींचे नाव असेल आणि ते वायनाड येथून निवडणूक लढवू शकतात. सध्या राहुल गांधी वायनाड येथून खासदार आहेत. राहुल गांधींशिवाय पहिल्या यादी ४० नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
केरळच्या सर्व खासदारांना पुन्हा संधी
ज्या ४० उमेदवारंचा नावे काँग्रेसच्या पहिल्या यादीत येऊ शकतात त्यात तिरूअनंतपुरम येथून शशी थरूर, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघल यांच्या नावावरही चर्चा झाली. या दोन्ही दिग्गजांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट होऊ शकतात. सूत्रांच्या मते केरळच्या सर्व खासदारांना काँग्रेस पुन्हा एकदा तिकीट देऊ शकते.
या राज्यांमधील उमेदवारांबाबत सहमती
काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि मेघालय येथील उमेदवारांबाबत सहमती झाली. यांच्या नावाची घोषणाही पहिल्या यादीत केली जाऊ शकते. केरळ, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि लक्षद्वीप येथील उमेदवारांची नावे फायनल झाली आहेत.