
काय आहे कारण?
पुणे : पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) भागात अनेक ठिकाणी मेट्रो आणि रस्त्याची कामं चालू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या (Traffic Jam) हा विषय अधिक गंभीर होत आहे. पुण्यातील नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात उद्यापासून जड वाहनांना 'नो एन्ट्री' (No entry) लावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांवर उद्यापासून बंदी लावण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic police) हा निर्णय घेतला आहे. जड वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना पुणे पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी जड वाहनांना आता पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे. प्रवेश बंदी असल्याने नियमांचं उल्लंघन केल्याचं दंड अथवा कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
काय आहेत पर्यायी मार्ग?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे नगर, पुणे सोलापूर, पिंपरी चिंचवड, पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. वाघोली ते पुणे शहराच्या दिशेने जड वाहनांना २४ तास प्रवेश करता येणार नाही. याऐवजी शिक्रापूरहून चाकण मार्गे पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे मार्गे मुंबई आणि अहमदनगरकडे जड वाहनांना जाता येणार आहे.
पुण्याहून सोलापूरला जाण्यासाठी थेऊर फाटा इथून लोणीकंद, शिक्रापूर मार्गे जावे लागेल. पुणे सासवड असा ज्या जड वाहनांना प्रवास करायचा आहे, त्यांनी हडपसर मार्गे थेऊर फाटा इथून प्रवास करता येईल. तिथून लोणीकंद, शिक्रापूर मार्गे प्रवास करता येणार आहे.