Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीParbhani Food poisoning : परभणीच्या सोना गावात ५०० हून अधिक तर पालम...

Parbhani Food poisoning : परभणीच्या सोना गावात ५०० हून अधिक तर पालम तालुक्यात ७ जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा

परभणी : परभणीमध्ये (Parbhani News) एक धक्कादायक घटना घडली आहे. परभणीच्या दोन गावांमध्ये भगर खाल्ल्याने गावकऱ्यांना विषबाधा (Food poisoning) झाली. माळसोना गावात काल रात्री एकादशीनिमित्त (Ekadashi) ग्रामस्थांनी भगर खाल्ली. मात्र, रात्रीच्या सुमारास अनेक ग्रामस्थांना उलट्या आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. पाचशेहून अधिक जणांना हा त्रास उद्भवला. त्यामुळे अडीचशे गावकऱ्यांना गावातील एका मंदिरात तर उर्वरित अडीचशे जणांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुसरीकडे पालम तालुक्यातही ७ जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव जवळ माळसोन्ना गाव आहे. या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात मंगळवारी एकादशी असल्याने सायंकाळी साडेपाच वाजता कथा समाप्तीनंतर उपस्थित भाविकांना भगरीचे वाटप करण्यात आले. या भगरीतून गावकऱ्यांना विषबाधा झाली. भाविकांनी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही भगर खाल्ली. अनेकांना साडेसात ते आठच्या दरम्यान रात्री उलटी, जुलाब त्रास सुरू झाला. त्यामुळे काही जणांनी गावातील डॉक्टरांकडे दाखवले. परंतु उलट्या होण्याचे प्रमाण वाढल्याने व त्रास होणाऱ्या गावकऱ्यांची संख्या देखील झपाट्याने वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले.

याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला घटनेची कल्पना देत तातडीने आरोग्य पथक सोना गावात पाठविण्याचे आदेश दिले. स्वतः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सोना गावास भेट दिली.

ज्या गावकऱ्यांना जास्त प्रमाणात उलट्या होत्या, त्या सर्व ग्रामस्थांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित ग्रामस्थांवर गावातील मंदिर सभागृहात उपचार सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व आरोग्य विभागाचे पथक सोना गावात ठाण मांडून होते.

पालम तालुक्यातही झाली विषबाधा

पालम तालुक्यात खोरस येथील शिवाजी साहेबराव मानगीर यांनी उपवासासाठी एका दुकानातून भगर विकत आणले होते. त्याची भाकरी करून शिवाजी मानगीर यांच्यासह पत्नी आशाताई मानगीर (वय ४६) आणि इंद्रजित गोविंदराव खंडागळे (वय ५०) यांनी खाल्ली. त्यानंतर दीड तासांनी इंद्रजित खंडागळे आणि शिवाजी मानगीर गावापासून १० किलो मीटर अंतरावर एका गावात गेल्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणे आदी त्रास सुरू झाला. म्हणून त्यांनी पालम येथील प्रयाग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेतली. येथे प्रथमोपचार करून शिवाजी मानगीर यांना लोहा (जि.नांदेड) येथील एका खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, शिवाजी मानगीर यांच्या पत्नीला देखील त्रास सुरू झाला. म्हणून त्यांना देखील पालम येथे आणण्यात आले. तिथे अशाच प्रकारचे चार रूग्ण पालम आणि गुळखुंड येथील होते. त्यात सुभाष लक्ष्मणराव क्षीरसागर (वय ५८) आणि त्यांच्या पत्नी सुनिता सुभाष क्षीरसगार (वय ५२ दोघे रा.पालम) यांचा समावेश आहे. त्यांनी देखील भगर खाल्याचे सांगितले. शिवाय, गुळखंड येथील सुमनबाई भगवानराव बगाडे आणि सारिका जगन्नाथ बगाडे यांनी देखील भगर खाल्ले होते. त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -