जी. ए. कुलकर्णी, नारायण धारप, श्रीकांत सिनकर, रत्नाकर मतकरी हे मराठीत गुढकथा लिहिणारे लेखक. प्रत्येकाची गुढकथा लिहायची स्वतंत्र शैली होती. पैकी नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी सर्व सामान्य वाचकांकडून आजही आवडीने वाचले जातात. त्यातल्या त्यात रत्नाकर मतकरींच्या कथांचं गूढ, मध्यमवर्गाला जास्त भावायचं. त्यामुळे मतकरींच्या बऱ्याच कथा “नेक्स्ट डोअर” वाटतात. जीए रंग लिहीत, धारप चेहेरे लिहीत, सिनकर अॅक्शन लिहीत, तर मतकरी व्हिज्युअल्स लिहीत. मतकरींची कुठलीही कथा वाचा. वाचकाला त्याच्या परिप्रेक्षाप्रमाणे व्हिज्युअल दिसण्याचा अनुभव येतोच. गूढकथांमध्ये मतकरींनी वाङ्मयीन प्रयोग केले. पैकी प्रथम पुरुषी एकवचनी कथांमुळे, तर मराठी साहित्याला वेगळी दिशाही मिळालेली आहे. मतकरींच्या कथांवर तरुणवर्ग विविध एकांकिका स्पर्धांमधून सतत प्रयोग करीत असतो. १९८० ते २००० या वीस वर्षांच्या कालावधीमधे मतकरींच्या कथांवर अनेक एकांकिका सादर झाल्या. पैकी कळकीचं बाळ, सुनीला पारनामे शाळेत जात होती, पांदेगा, झोपाळा आणि अशा अनेक एकांकिकांनी मतकरींच्या व्हिज्युअल्समधील बलस्थानं अधोरेखित केली होती. २०२१-२२ मध्ये, तर अखिल महाराष्ट्रात मतकरींच्या कथांवर आधारीत “रत्नाकर करंडक” भरवण्यात आला होता. त्यातच “२१७ पद्मिनी धाम”चा जन्म झाला. हौशी मंडळीनी एकांकिका स्वरूपात सादर केलेली एकांकिका आणि तिच व्यावसायिक स्वरूपात दोन अंकी नाटक म्हणून बघण्यात निश्चितच वेगळेपण आहे. सुमती क्रिएशन्स, फलाट आणि दुर्वा पूर्वा क्रेडिट सोसायटी निर्मित २१७ पद्मिनी धाम हे नाटक म्हणजे मिलिंद शिंदे यांचा एकखांबी अभिनय आणि नेपथ्याच्या किमयागिरीची अद्भूत कामगिरी आहे.
मतकरी आपल्या कथांची सुरुवात नेहमी रिअलॅस्टिक बेसवर करतात. तशीच ती या इथेही आहे. काॅलेजमधून सुरू झालेलं कथानक पुढल्याच प्रसंगात गूढतेकडे घेऊन जातं. त्यामुळे पहिल्या १५/२० मिनिटात प्रेक्षकांना हुक करण्याचं गमक दिग्दर्शक संकेत पाटील यांनी छान साधलंय. प्रेक्षक एकदा गळाला लागले की, कथा एस्टॅब्लिश करण्यासाठी पुढील काही वेळ रेंगाळली तरी प्रेक्षक कंटाळत नाही. पूर्वीच्या भयपटांमधून कुरकुरणारा आवाज काढत उघडले जाणारे दरवाजे, फ्रेमवरून पडणारा हार, नायिकेचे क्षणात गायब होऊन दुसऱ्या जागी प्रकट होणे इत्यादी गमती-जमती बघत प्रेक्षकवर्ग कथानकात गुंतला जातो. मग पुढील नाटक मिलिंद शिंदे हातात घेतात आणि अभिनयाचे कंगोरे दाखवत धुवांधार बॅटिंग करत कधी इंटरव्हलला आणून सोडतात. ते कळंत नाही. दुसऱ्या अंकातला पुढला प्रवास मात्र ऋतुराज फडके, अमृता पवार आणि अनिकेत कदम या कलाकारांवर येऊन पडतो. तिघेही नाटकाला गती देण्याच्या प्रयत्नात बरीच धावपळ भबैयू करतात आणि जाता जाता जमेल तेवढा अभिनय करतात. मुख्यत्वे आपण रंगभूमीवर अभिनय करतो आहोत हेच विसरतात. मालिका अभिनयाप्रमाणे आंगिक अभिनयाचा वापरच टाळतात. त्या उलट मिलिंद शिंदे वाचिक आणि सात्त्विकतेचा परिपाठ उभा करतात. तसं बघायला गेलं तर मिलिंद शिंदे सोडले, तर बाकी सर्व कलाकार व्यावसायिक रंगभूमीसाठी नवखे आहेत. नेमकं काय करावं आणि काय टाळावं हे शिकायला तसा वेळ आहे; परंतु एका सक्षम अभिनेत्यासमोर उभे राहायचे झाल्यास आपण स्वतःलाच अधोरेखित करायला जाऊ नये. हा संकेत प्रकर्षाने पाळावा लागतो. जगप्रसिद्ध “बेकेट” थिअरीचा तो एक भाग आहे. हे जरी असलं तरी नाटक कुठेही कमी पडत नाही. प्रत्येक कलाकार जबाबदारीने वावरतो आणि नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो.
आपल्या मराठी रंगभूमी गूढकथांची सवय नाही. एखाद दुसरी मर्डर मिस्ट्री हिट झाली असेल तेवढीच. सद्यस्थितीत दोन सस्पेन्स थ्रिलर कम मर्डर मिस्ट्री सुरू आहेत. पैकी एका नाटकाने प्राण सोडलाय व दुसरे दोन दिग्गज कलाकार असूनही व्हेंटिलेटरवर आहेत. दोन्हींची कथानके पाश्चात्त्य आहेत. त्यांना जरी भारतीय कपडे आणि तोंडवळा दिला असला तरी त्यांचे अंतःप्रवाह पाश्चात्त्य आहेत, हे कळण्याइतपत मराठी प्रेक्षक बावळट नाही. बर त्या नाटकांच्या कथासूत्रांवर आलेले हिंदी चित्रपटदेखील बरेच गाजले होते. त्यातही ते हिंदी चित्रपट इंग्रजी चित्रपटांवर आधारलेले होते. थोडक्यात मराठी रंगभूमीवर सादर झालेल्या गूढकथेला भारतीय बैठक नव्हती. २१७ पद्मिनी धाम या नाटकास मात्र ती बैठक जाणवते. मतकरीच नव्हे, तर धारप, जीए, स्वतःच्या कल्पकतेचा पट उभारतात. स्वतःच्या मुलीचा अस्थिपंजर तिच्या प्रियकराला भेट देण्याच्या संकल्पनेचे नाटक भारतीयच असल्याचे पुरावे कथानकात जागोजागी दिसतात. मिलिंद शिंदे यांनी साकारलेला विम्झिकल बाप व त्याची मनोवृत्ती तद्दन भारतीय आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेचे संदर्भ इतर कलाकृतींमध्ये शोधत बसण्यापेक्षा ती नव्याने जन्मास घालणे हेच त्यावरचे सोल्युशन होते. एन.एस.डी.एन्स.साठी अशा प्रोसेसची नाटकं म्हणजे पर्वणीच असते. मिलिंद शिंदे यांची या नाटकाची थिएटर प्रोसेस नक्कीच इंटरेस्टिंग झाली असणार. सहकलाकारांनी ती प्रोसेस आत्मसात करायला हवी होती. आपल्या प्रेयसीचा सांगाडा टांग्यातून घेऊन जाण्याचा प्रसंग खरं तर अंगावर यायला हवा. त्यातही रात्री वाटेतल्या जंगलात चहा प्यायला थांबल्यावरचा प्रसंग पाहिजे तसे अंगावर येत नाहीत, त्यामुळे ते कंटाळवाणे वाटू शकते. असो; परंतु नचिकेत दांडेकर व संकेत पाटील यांनी एक सशक्त नाट्यानुभव दिला. शुभम ढोकळे याचे संगीत नाटकास पूरक व पोषक आहे मात्र गाण्यांच्या चाली अजून मेलिडीअस असायला हव्या होत्या. चाली लोकांनी गुणगुणायला हव्यात. एकच गाणे रिपिट करण्याचे धोरण नाटकाच्या मार्केटिंगचा भाग बनू शकते, या बाबत विचार व्हावा.
अमृता पवार, सचिन नवरे, अनिकेत कदम आपापली भूमिका मात्र चोख बजावतात. नेपथ्य आणि प्रकाश योजना यंदाच्या सन्मान आणि गौरवात अव्वल ठरणार, याची हमी शीतल तळपदे आणि संदेश बेंद्रे यांना देऊ शकतो. किरण दीपक भोगले, देवेंद्र नाईक व दीप्ती ताठेले यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. खरंतर आता कुठे नाट्यसृष्टी कोविडच्या विळख्यातून सावरतेय. साधारणतः ५० नाट्यसंच असलेलं नाटक करणे हे दिव्यचं. नाटकाची टीम जरी हौशी असली तरी खर्च हा असतोच. त्याची सांगड घालतं व मिलिंद शिंदेंसारख्या व्यस्त कलाकाराने या नाटकाचा डोलारा उचलून एक गूढ नाट्यानुभव दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…