Monday, March 17, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनKonkan tourism : कोस्टल मॅरेथॉनसारखाच कोकण पर्यटन

Konkan tourism : कोस्टल मॅरेथॉनसारखाच कोकण पर्यटन

विकासालासुद्धा वेग मिळू दे!

दृष्टिक्षेप : अनघा निकम-मगदूम

गतवर्ष प्रमाणेच याही वर्षी रत्नागिरीमध्ये एक उत्तम उपक्रम आयोजित केला जात आहे. कोकण कोस्टल मॅरेथॉनचे (coastal marathon) दि. ७ जानेवारीला रत्नागिरी शहरात आयोजन करण्यात आले असुन रत्नागिरी ही धावनगरी होत आहे. या मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड तसेच उर्वरित महाराष्ट्रातून प्रसिद्ध धावपटू सहभागी होत आहेत. क्रीडा उपक्रमाच्या माध्यमातून कोकणातील पर्यटन (Konkan tourism) एक्सप्लोअर करण्याचा आयोजकांचा एक उत्तम प्रयत्न आहे.

गतवर्षी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीत पहिल्या सायकल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने राज्यातील वेगवेगळ्या भागांतील सायकलपटू कोकणात, रत्नागिरीत आले होते. रत्नागिरीत हा पहिला उपक्रम होता. या उपक्रमाची खूपच चर्चा झाली. आत्ता हेच सायकलपटू कोस्टल मॅरेथॉनमध्ये सुद्धा आहेत. खूप मोठ्या उत्साहाने कोस्टल मॅरेथॉनची तयारी करण्यात आली आहे. अत्यंत उच्चप्रतीच्या, प्रोफेशनल पातळीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत ५, १० आणि २१ किमी (हाफ मॅरेथॉन) या स्पर्धेकरिता जवळपास १५०० जणांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ४० टक्के धावदूत हे महाराष्ट्र व देशभरातील आहेत. पर्यटन, रत्नागिरी डेस्टिनेशन व्हावे या सुहेतूने मॅरेथॉन प्रभावशाली होण्याकरिता चोख नियोजन करण्यात आले आहे. सुवर्णसूर्य फाऊंडेशनच्या माध्यमातून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असताना स्थानिक पातळीवर अनेक हात मदतीला पुढे आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, ब्रूक्स, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, एमआर असोसिएशन आदींचे योगदान लाभत आहे.

आयोजकांनी डिसेंबर २०२२ पासून ही मॅरेथॉन करण्यासाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली होती. त्याकरिता राज्यभरातील १२ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये आयोजकांनी भाग घेऊन तिथल्या नियोजनाची माहिती घेतली आहे. त्यानुसार रत्नागिरीत नियोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनसाठी बाहेरगावाहून धावपटू रत्नागिरीत येत आहेत. त्यानिमित्ताने रत्नागिरीतील सर्व हॉटेल्स आरक्षित केलेली आहेत. भाट्ये येथे स्पर्धकांना परत नेण्याकरिता रिक्षाचालक संघटनेशी चर्चा झाली असून, त्या माध्यमातूनही रिक्षाचालकांना फायदा होणार आहे. बोर्डिंग रोड येथील तारांगण येथे शनिवारी (दि. ६ जानेवारी) सकाळी १० ते ६ या वेळेत स्पर्धकांना बिब (नंबर) देण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना मिळून साधारण २ लाखांहून अधिक रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला आंब्याच्या आकारातील मेडल मिळणार आहे.

ही स्पर्धा ऐतिहासिक थिबा पॅलेस रोडवरील हॉटेल मथुरा येथून ७ जानेवारी रोजी सुरू होईल. २१ किलोमीटरसाठी सकाळी ६ वाजता झेंडा दाखविण्यात येईल. धावपटू हे नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप येथून धावत भाट्ये येथे समारोप होईल. १० किमीसाठी स. ६.१५ वाजता झेंडा दाखवून सुरुवात होईल. नाचणे, शांतीनगर व वळसा मारून मारुती मंदिरमार्गे भाट्ये येथे पोहोचतील. ५ किमीची स्पर्धेस स. ६.५० वाजता सुरुवात होईल. मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाट्यापर्यंत स्पर्धक येतील. या धावमार्गांवरील सर्वच गावांना त्यांचा इतिहास, संस्कृती आहे, वैशिष्ट्य आहे. ही गावे त्यानिमित्ताने एक्सप्लोअर होतं आहेत.

या स्पर्धेत कोकण वगळता अन्य भागांतील धावपटू सहभागी होणार असल्याने रत्नागिरीची चर्चा सर्वदूर होणार आहे. येथील पर्यटन विकासासाठी ही सर्वात मोठी गोष्ट ठरणार आहे.

कोकणाला कॅलिफोर्निया बनविणार असल्याचे गेले अनेक वर्षांपासून म्हटले जात आहे. मात्र पर्यटन विकास हा स्वतंत्र विषय आहे. कुठल्यातरी प्रदेशाचा नकाशा समोर ठेवून पर्यटनावर काम करण्यापेक्षा प्रत्येक भागाचा स्वतंत्र अभ्यास करणे आवश्यक असते. सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र रत्नागिरी अजूनही यासाठी चाचपडत आहे. आजही रत्नागिरीला श्रीक्षेत्र गणपतीपुळेवरून अनेक भागांमध्ये ओळखले जाते, पण रत्नागिरी हा वैशिष्ट्यपूर्ण भूभाग आहे. अनेक भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये या भूमीत दडली आहेत. ती जगाला दाखविण्यासाठी जगाला येथे बोलावले पाहिजे आणि याचे आमंत्रण देताना कोणत्यातरी उत्तम उपक्रम, कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे.

तसेच आयोजन कोस्टल मॅरेथॉनच्या निमित्ताने होतं आहे. क्रीडा उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटन विकास, मेडिकल टुरिझम, अशा विविध क्षेत्रांतून येथील पर्यटनाला आणि पर्यायाने पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. आता दर वर्षी नको, तर सातत्याने असे हे उपक्रम झाले पाहिजेत. गतवर्षीचे सायकल संमेलन, आजचे कोस्टल मॅरेथॉन ही त्याचीच उदाहरणे असून, यात सातत्य असावे आणि असे उपक्रम सतत घडावे, हीच यानिमित्ताने अपेक्षा आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -