- समर्थ कृपा : विलास खानोलकर
गंगा नदीच्या काठावर वसलेल्या हरिद्वार या तीर्थक्षेत्री दोन पहिलवान राहत होते. मल्लविद्येत ते निपुण होते. त्यांच्या अंगी हत्तीचे बळ होते. बलदंड आणि धिप्पाड असलेले ते दोघे पहिलवान स्वभावाने मात्र क्रूर आणि वागण्या-बोलण्यात मग्रुर होते. आपल्या अंगी असलेल्या बळाचा त्यांना गर्व होता. संपूर्ण गावात त्यांची दहशत होती.
एकदा दोघेही खूप आजारी पडले. त्यातच त्यांची शक्ती क्षीण झाली. हात-पाय हे वेडे-वाकडे झाले. त्यांना अगदी चालणे-फिरणेही कमालीचे मुश्कील झाले. एकदा वेगाने चालत श्री स्वामी थेट गंगा-घाटावर पोहोचले. तिथे ते दोघे दुष्ट पहिलवान आपल्या कर्माची फळे भोगत असल्याचे त्यांना दिसले. श्री स्वामींना बघून दोघे दीनवाणेपणे मनातल्या मनात स्वामींची करूणा भाकीत माफी मागू लागले. स्वामींच्या पायाशी लोळू लागले.
ते बघून तिथे लोकांची गर्दी जमू लागली. ते दोघे कोण आहेत, हे श्री स्वामी पूर्णपणे जाणत होते. त्यांची पापकर्मे त्यांना माहीत होती. पण तरीही स्वामींना त्यांची दया आली. त्यांनी आपले चरण त्या दोघांना लावले. त्याबरोबर त्यांचा भयानक रोग बरा झाला. निरोगी होऊन ते पुन्हा पूर्वीसारखे दिसू लागले.
निरोगी होऊन उठताच त्यांनी श्री चरणांवर लोळण घेतली. अश्रू ढाळत माफी मागू लागले. यापुढे सज्जनपणाने वागण्याची आणि कष्ट करून पोट भरण्याची शपथ घेतली व पुढील आयुष्य श्री स्वामींची सेवा करू लागले.
त्याच गर्दीत एक कुटिल स्वभावाचा, संशयखोर ब्राह्मण उभा होता. त्याने घडलेला सर्व प्रकार पाहिला. स्वामींच्या बाबतीत त्याच्या मनात शंका आली. स्वामींची चौकशी करण्यासाठी तो तोंड उघडणार तोच रागाने त्याच्याकडे बघत स्वामींनी त्याला थांबविले. ते कडाडून म्हणाले की, तुझ्या मनात आलेल्या शंकांचं मी नंतर निरसन करतो. आधी तू तुझा पूर्वेतिहास जाणून घे! मागच्या जन्मी तू हस्तिनापुरात राहणारा एक शिकारी होतास, पण तू दुष्कृत्ये व पापकर्मे करणारा होतास. या जन्मीही तू पापकर्मे केलीस. अगदी कालही तू एका निरपराध गाईला ठार केलेस. कुठे फेडशील हे पाप?
स्वामींचे ते कडक आवाजातील बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाचा भीतीने थरकाप उडाला. तो गर्भगळीत होऊन स्वामींच्या पाया पडू लागला. हा प्रकार बघून लोकही संतापले. त्यांनी त्या ब्राह्मणाला घेराव घातला. श्री स्वामी सर्व लोकांना आणि त्या दुष्ट ब्राह्मणाला घेऊन त्याच्या घरी गेले. तेथे घराच्या मागे एक गाय मरून पडलेली लोकांना दिसली. ते बघून लोकांचा राग अनावर झाला. ब्राह्मणाच्या अंगावर काही लोक धावून गेले. त्यांना थांबवून स्वामींनी त्या ब्राह्मणाला त्याच्या या कृत्याचा जाब विचारला. धावत जाऊन त्या ब्राह्मणाने एका पात्रात पाणी आणले. स्वामींचे चरण धुवून ते तीर्थ गाईवर शिंपडले. काही वेळात गाय जिवंत होऊन उठून बसली. ते बघून साऱ्यांनी स्वामींचा जयजयकार केला. तो ब्राह्मण मग स्वामींच्या पाया पडला व सदैव त्यांच्या सेवेत राहिला.
स्वामीच दत्त स्वामीच राम
स्वामींच्या पालखीस जावे पायी ।
तो सारे संकट विरहित होई ।।१।।
समर्थांचे नाम सदा घ्यावे ।
आपले काम नीट करावे ।।२।।
श्रीपाद वल्लभ दत्त प्रभू तू ।
साक्षात ब्रह्मा-विष्णू-महेश तू ।।३।।
जो संपला वाटे संकटाने ।
क्षणात तारे स्वामी नामाने ।।४।।
संत नृसिंह सरस्वती आला ।
महान संत तो अक्कलकोट आला ।।५।।
जय हो जय हो समर्थ ।
क्षणात नष्ट करिती अनर्थ ।। ६ ।।
साऱ्या पृथ्वीचा तूच प्रणेता ।
साऱ्या जीवनाचा तूच त्राता ।।७।।
उद्धटाला दिला तू दंड ।
खटनटाला केला अति दंड ।।८।।
जय जय नृसिंहभान राणा ।
सकळ धरतीचा तूच राणा ।।९।।
कोणी न जाणे तव अनुमाना ।
तूच दत्ता राम हनुमाना ।।१०।।