जिथे कुटुंबातील जिवंत माणसांमधली नातेसंबंधांची गाठ सैल होते, तिथे मृत पावलेल्या लोकांकडे पाहण्यासाठीसुद्धा कुणाकडे फारसा वेळ नसतो. अशा वेळी बेवारस असलेल्यांचे तर हालच. या बेवारस मृतदेहांवर आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे सेवाभावी व्रत जोपासणारे समाजसेवक म्हणजे इक्बाल ममदानी. शवगृहातून बेवारस मृतदेह ताब्यात घ्यायचा, कुजलेल्या, छिन्नविच्छिन्न झालेल्या त्या शरीराचे भाग उचलून ते शववाहिनीत ठेवून स्मशानाची वाट धरायची. कधी मुलगा, कधी बाप तर कधी भाऊ म्हणून मृतदेहांवर त्याच्या धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करायचे. कोराेनाच्या कठीण काळात कोणी आप्तेष्ट, रक्ताची नाती मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता पुढे येत नसताना ममदानी आणि त्यांच्या टीमने मृतदेहांवरील अंत्यसंस्काराला सुरुवात केली. आजही बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम ममदानी आणि त्यांची टीम करते. दैनिक प्रहारच्या ‘गजाली’ या कार्यक्रमात समाजसेवक इक्बाल ममदानी भरभरून व्यक्त झाले. दैनिक प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, जाहिरात व्यवस्थापक दिनेश कहर यांनी त्यांचे स्वागत केले.
वसा बेवारसांच्या अंत्यसंस्काराचा
तेजस वाघमारे
मायानगरी मुंबईत अनेक धर्मांचे, जाती वर्गाचे लोक वास्तव्य करत आहेत. कुणी कुबेराच्या वस्तीत तर कुणी झोपडपट्टीत…हजारो कुटुंबीयांनी तर खुल्या आभाळाखाली उड्डाणपुलाखाली, पदपथावर आपला संसार थाटला आहे. मिळेल तो कामधंदा करत प्रत्येक जण सुखासाठी धडपडत असतो. विविध कारणांनी कुटुंबापासून विभक्त झालेले, नातेसंबंध तुटलेले किंवा या जगात या मायानगरीशिवाय कुणीही नसलेले हजारो लोक जीवन कंठीत आहेत. अशा बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पोलीस, महापालिका अशा व्यक्तींचे अंत्यसंस्कार करतात. पण कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासही अनेकांनी नकार दिला होता. कुणीही अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नसलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा वसा समाजसेवक इक्बाल ममदानी यांनी घेतला. संबंधित कुटुंबाकडून एक रुपयाची मदत न घेता, स्वतः हजारो बेवारस मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले.
मृत व्यक्ती आपल्या परिवाराचा एक भाग म्हणून त्यांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या धर्मानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मृतदेह हिंदू आहे की मुस्लीम याची ओळख पटवून इक्बाल ममदानी यांनी मृतदेहावर धार्मिक विधी करत अंत्यसंस्कार केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जनजीवन ठप्प असतानाही इक्बाल ममदानी यांनी हिंदू मृतदेहासाठी तुळशीपत्र ते गंगाजल मिळवत हिंदू मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तर मुस्लीम, ख्रिचन मृतदेहांवर त्यांच्या धर्मानुसार दफन केले. स्वतःच्या पत्नीचा कोरोनामध्ये मृत्यू झाल्यानंतरही हाती घेतलेला वसा त्यांनी अर्ध्यावर सोडला नाही. त्यावेळी शवागृहात मृतदेहाचे खच पडले होते. पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने इक्बाल ममदानी यांनी त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.
बेवारसांवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर ते मला भेटण्यास येतात. धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार केल्याबद्दल माझे आभार व्यक्त करतात, हीच माझ्या कामाची पावती असल्याचे ममदानी सांगतात. कोरोनाची भीती संपली असली तरी मुंबईत दर महिन्याला सुमारे ५०० बेवारस मृतदेहांवर ते अंत्यसंस्कार करत आहेत.
कोरोनाबाधित दोन हजार ‘लावारिसां’चे मुक्तिदाता
वैष्णवी भोगले
कोरोना काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले. रस्त्यावरून सायरन वाजवत जाणाऱ्या रुग्णवाहिका, कोरोना रुग्णांनी, मृतदेहांनी भरलेली शवागृहे हे कोरोना काळाचे भयानक दृश्य आठवले तरी अंगावर काटा उभा राहतो. प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत होता. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर त्याचे नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यास देखील नकार द्यायचे. त्यावेळी काही वेळासाठी वाटले की माणसातील माणुसकी मरून तर गेली नाही ना? मात्र अशा कठीण काळात इक्बाल ममदानी आणि त्यांच्या ७ जणांच्या टीमने पुढाकार घेत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा वसा घेतला. दिवसागणिक ही टीम २०० जणांवर गेली. कोरोनाच्या काळात जे काम लोक भीतीपोटी टाळत असत, तेच काम ममदानी आणि त्यांच्या टीमने वारसा असल्यागत स्वीकारले. त्यांचे हे कार्य आजतागायत कायम आहे. आता ते बेवारस मृतदेहांवर त्यांच्या धर्मानुसार धार्मिक विधी पार पाडत अंत्यसंस्कार करतात.
इक्बाल ममदानी सांगतात की, २०२० मध्ये कोविड महामारीने मृत्यूचा कहर केला होता. प्रत्येक व्यक्ती भीतीच्या छत्रछायेखाली जगत होती. हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत होते. हॉस्पिटलमधून स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकांची कमतरता होती. त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याला मर्यादा येत होत्या. भीतीपोटी कोणी रुग्णवाहिका देण्यास तयार नव्हते. मित्रांच्या मदतीने मोडकळीस आलेल्या ५ रुग्णवाहिका दुरुस्त करून त्यात आणखी तीन रुग्णवाहिका ममदानी आणि त्यांच्या टीमने घेतल्या. ८ रुग्णवाहिकांपैकी मृतदेहांसाठी आणि स्वतंत्र रुग्णवाहिका असे विभाजन करण्यात आले. अशा प्रकारे कामाला सुरुवात झाली. पहिली ७ जणांची टीम होती. २० ते २२ दिवसांत २०० जणांची टीम हे काम करण्यास तयार झाली. या टीमच्या मदतीने कोरोना काळात आम्ही २ हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले, तर आतापर्यंत ५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दर महिन्याला आम्ही ५०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतो. जेव्हा आम्हाला समजले की, हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची संख्या वाढत चालली आहे, तेव्हा शासनाची परवानगी घेऊन बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या धर्मातील रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. कोविड काळात अनेक दिवस कामात व्यस्त असल्याने घरी जाण्यासही वेळ मिळत नसे. कोरोनाचा काळ संपल्यानंतरही हे काम पुढे कायम सुरू ठेवण्यात आले. हे काम करताना खर्च येत असून कामगारांना पगार देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या कामासाठी एक वेबसाईट तयार करून सर्वसामान्यांची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ममदानी सांगतात.
बेवारस मृतदेहांचे ‘वारसदार’ इक्बाल ममदानी
सीमा पवार
कोविड काळात बेवारस व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे आलेल्या इक्बाल ममदानी आणि त्यांच्या टीमने सर्वधर्मियांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. इक्बाल ममदानी यांना असा विश्वास आहे की, मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही आणि अल्लाहला प्रसन्न करायचे असेल तर प्रत्येक जीवाची सेवा केली पाहिजे. कोविड काळात जिथे मृत्यूच्या भयाने नात्यांनीही पाठ फिरवली अशा अनेक मृतदेहांवर इक्बाल ममदानी यांनी अंत्यसंस्कार केले.
इक्बाल ममदानी कोविड काळातील अनुभव सांगत होते. हॉस्पिटलमध्ये मृत्यूची संख्या वाढू लागली. कोविडने मृत्यू झालेले मृतदेह नातेवाइकांना न देण्याचा सरकारने नियम काढला. त्याचवेळी एका मुस्लीम व्यक्तीचा कोविडने मृत्यू झाला होता. सरकारच्या नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. मात्र यावर बराच वाद झाला. जगभरात कोविडने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मग आपल्याकडेच का नाही. या गोष्टी सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर अखेर यात बदल करण्यात आला. त्यानंतर मुंबईत अंत्यविधी करण्यासाठी ७ ठिकाणांना सरकारकडून मंजुरी देण्यात आली. अंत्यविधीची परवानगी देण्यात आली, पण अंत्यविधी करणार कोण?, हा मुद्दा होता. २० आणि नंतर ५० लोकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची परवानगी सरकारने दिली. पण कोविडने मृत्यू होणारी प्रत्येक व्यक्ती बेवारस झाली होती. कारण मृत्यूचे भय प्रत्येकाला होते. ईश्वराने अशा कामासाठी आपली निवड केली असे ममदानी मानतात. कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा आर्थिक फायदा न पाहता त्यांनी ७ ते ८ जणांची एक टीम तयार करून आपल्या कामाला सुरुवात केली. इक्बाल ममदानी यांनी त्यावेळी सुमारे दीड हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.
ममदानी सांगतात की, जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही फक्त मुस्लीम मृतदेहांवर दावा करायचो आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पण आम्ही रुग्णालयांच्या शवगृहाकडे जायला लागलो तेव्हा दिसले की, अनेक मृतदेह घ्यायला कोणीच तयार नव्हते. मग डॉक्टरांशी बोललो की तुमची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्या प्रथेनुसार अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करू शकतो. रुग्णालयाने पोलिसांची परवानगी घेण्यास सांगितले. इक्बाल ममदानी आणि त्यांच्या टीमने मृत व्यक्तीला त्याच्या धर्मानुसार निरोप दिला जाईल याची पूर्ण काळजी घेतली. गेलेल्या माणसाशी इक्बाल यांचा कोणताही संबंध नव्हता. पण अनेक वेळा हे काम करताना त्यांचे डोळे पाणावतात. मुस्लिमांसाठी अंत्यसंस्कार केले, तर हिंदूंवरही त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केल्याचे ममदानी सांगतात.
कोरोनानंतरही इक्बाल ममदानी आणि त्यांच्या टीमने आपले हे काम सुरूच ठेवले आहे. मुंबईत दर महिन्याला ५०० बेवारस मृतदेहांवर आता ही टीम अंत्यसंस्कार करते. त्यांची एकूण दहा जणांची टीम आहे. जेव्हा कोणी लोकल किंवा मेलखाली येतो तेव्हा पोलीस त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्यानंतर पोलीस मृताची ओळख पटवून त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा मृत व्यक्तीच्या खिशात पर्स किंवा मोबाइल सापडतो आणि त्यातून कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र महिना-दीड महिना कुटुंब सापडत नाही, तेव्हा पोलीस त्याला बेवारस घोषित करतात. त्यानंतर रुग्णालयाच्या शवागारातून मृतदेह इक्बाल ममदानी आणि त्यांच्या गटाकडे दिला जातो. एक महिन्यानंतर हातात आलेल्या नि:शब्द आणि शांत झालेल्या त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात.