Nana Patekar : बाळासाहेबांनंतर मातोश्रीतली आपुलकी संपली; राज-उद्धव ठाकरेंना ते जमलंच नाही

  315

अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली नाराजी


मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यानंतर मातोश्रीतली आपुलकी संपली, कलागुणांना वाव देणं आणि कलाकारांशी संबंध ठेवणं राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) कधी जमलंच नाही, असे परखड मत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना व्यक्त केले.


ठाकरे कुटुंबीयावर बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनंतर राज आणि उद्धवशी ते नातं राहिलं नाही. कारण काही गोष्टी असतात ज्या एकमेकांना पटत नाहीत. त्यामुळे नात एका बाजूने राहत नाही, असं म्हणत नाना यांनी ठाकरे बंधुंवर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील राजकारणावर देखील प्रतिक्रिया दिली.


बाळासाहेबांच्या असंख्य आठवणी सांगता येतील. मुस्लिम कार्यकर्त्याला नमाज पठणासाठी दिलेला वेळ असो की दादा कोंडके यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना बाळासाहेबांनी वेळोवेळी मदत केली. तडजोड करुन का होईना पण त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या संजय दत्तलाही मदत केली. बाळासाहेबांची जडणघडण ही प्रबोधनकारांच्या कडक शिस्तीत झाली. प्रबोधनकारांकडे दिवाळीच्या फराळाला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि विरोधी पक्ष नेते आचार्य अत्रे एकत्र यायचे. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या पाहुण्यांची सरबराई करण्यात मग्न असायचे. ही आठवण खुद्द बाळासाहेबांनीच अनेकदा सांगितली. बाळासाहेबांनी या श्रीमंतीचा वारसा मातोश्रीत जपला. म्हणूनच बाळासाहेब हे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट या पलिकडचे असंख्य लोकांचे मित्र बनले होते. दिलीप कुमार सारखे अनेक चित्रकार कलावंत मातोश्री मध्ये येत होते. मायकेल जॅक्सन पासून जावेद मियांदाद पर्यंत आणि अगदी शरद पवार, प्रतिभाताई पाटलांपासून प्रणव मुखर्जींपर्यंत अनेकांनी बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर हजेरी लावली होती. मातोश्री हे त्या अर्थाने या सर्व ज्येष्ठ वरिष्ठांसाठी मुक्त द्वार होते. मातोश्रीचा हा वारसा आज कुठे आहे?, हाच प्रश्न पडला आहे.


यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, बाळासाहेब होते तेव्हा ते मला आवर्जून फोन करायचे. भेटायला बोलवायचे. तो एक फोन होता आणि त्यांच्याशी एक नात होतं. मात्र बाळासाहेब गेल्यानंतर मातोश्रीशी संबंध संपला. त्यानंतर मला फोन आले नाहीत. कधीतरी राजशी बोलणे व्हायचे पण पुढे ते बंद झाले.


यावेळी राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना नाना म्हणाले की, राजवर माझा राग नाही. माझ्यावरही त्याचा राग नसेल. आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्याने केलेली कितीतरी भाकीत देखील खरी ठरली आहेत. मात्र मी जेव्हा राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला हवे, असे म्हटले होते. त्यावर राजने कोणताही मागचापुढचा विचार न करता, नानाला राजकारणात काय कळतं? त्याने नाक खूपसू नये. असं म्हटलं. मला खरंच कळत नाही. आपल्या इच्छा-सदिच्छा असतात त्या आपण बोलतो. भावंड आहेत एकत्र यायला हरकत काय? एकमेकांशी रक्ताचा नातं आहे. एकत्र आले तर बिघडलं कुठं? कारण त्यांच्या एकत्र येण्यातून काहीतरी चांगलं निघेल, हे माझे त्यावेळी प्रांजळ मत मी व्यक्त केले होते, असेही यावेळी नाना पाटेकर म्हणाले.


मात्र यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरची नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, काही गोष्टी असतात ज्या एकमेकांना पटत नाही. प्रत्येक गोष्ट पटायलाच हवी असं काही नाही. काही मत वेगळी असतात, त्यामुळे आता भेटायचं राहून गेलं. पण मी वाट पाहत होतो. मात्र आता ते नातं राहिलं नाही. कारण नातं एका बाजूने राहत नाही. मी राजकडे घरी जायचो जेवायचो. मी तुमच्याकडून काय घेणार होतो? अथवा तुम्ही मला काय देणार होते? माझ्याकडे सगळेच आहे. मी आनंदी आहे. गरजा कमी आहेत. मला कुठले पुरस्कार नको आहेत. कशासाठी शिफारसही नकोय. असेही यावेळी नाना पाटेकर म्हणाले.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ