Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीNagpur Bank Scam : नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळ्यात काँग्रेसचे सुनील...

Nagpur Bank Scam : नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळ्यात काँग्रेसचे सुनील केदार दोषी!

घोटाळ्यावेळी होते बँकेचे अध्यक्ष

नागपूर : लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आल्या असताना काँग्रेसचे (Congress) एकेक घोटाळे बाहेर येत आहेत. नुकतंच काँग्रेसचे खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्याकडे मोजता येणार नाहीत इतक्या नोटा सापडल्या. ३५० कोटींहून अधिक काळा पैसा त्यांनी लपवून ठेवला होता. तर आता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळ्यात (Nagpur Bank Scam) काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टाने आज हा निकाल दिला.

कोर्टाने सुनील केदार (तत्कालीन बँक अध्यक्ष), केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी हे तीन रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी मानले आहे. दरम्यान, सध्या कोर्टात शिक्षेच्या प्रमाणावर युक्तिवाद सुरु आहे. सहा दोषींचे वकील युक्तिवाद करत आहेत.

काय आहे घोटाळा?

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २००१-२००२ मध्ये होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खासगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी शेअर्स खरेदी केले होते. मात्र सहकार विभागाच्या कायद्यानुसार बँकेची परवानगी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती. त्यावेळी १९९९ सालापासून सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होचे. मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले शेअर्स मिळाले नाहीत, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते.

धक्कादायक म्हणजे पुढे शेअर्स खरेदी करणाऱ्या या खासगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. त्यामुळे बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. या प्रकरणी सुनिल केदार आणि अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी शेअर्सही दिले नाहीत आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे.

तेव्हा गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडी कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यावर २२ नोव्हेंबर २००२ रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता. आज या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली ज्यात तत्कालीन बँकेचे अध्यक्ष सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -