फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
नुकतेच हायकोर्टाने हे स्पष्ट केले आहे की, कोणतेही स्त्री अथवा पुरुष कायदेशीर लग्न न करता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये, प्रेमप्रकरणामुळे, अनैतिक संबंधामुळे एकत्र राहत असतील आणि त्यांचा पहिल्या लग्नाचा कायदेशीर घटस्फोट झालेला नसेल, तर असे संबंध व्यभिचार आहेत. म्हणजेच कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाने अशा पद्धतीने एकत्र राहणे हे कायद्याला धरून नाही आणि जोपर्यंत स्त्री अथवा पुरुषाचा घटस्फोट झालेला नाही, त्याची पहिली पत्नी अथवा पहिला पती हयात आहे, अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणे, एकत्र राहणे बेकायदेशीर आहे.
आजमितीला समाजात वाढत चाललेले अनैतिक विवाहबाह्य संबंध, प्रेम प्रकरण, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रकार, विवाहित पुरुषासोबत, महिलांसोबत राजरोजपणे ठेवले जाणारे शारीरिक संबंध या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. या सर्व गोष्टींवर पाहता अतिशय कॉमन, नॉर्मल, लाईफ स्टाईल, गरज, मजबुरी, स्वातंत्र्य, मजा, चंगळवाद, आर्थिक लाभ मिळवणे यामधून उदयाला येत असल्या तरी त्याचे अत्यंत क्लेशदायक परिणाम भविष्यात भोगायला लागतात, याची जाणीव संबंधित स्त्री-पुरुषांना नाही हे समाजाचे दुर्दैव आहे.
कुटुंब असलेले, विवाहित मुलं-बाळ असलेले स्त्री- पुरुष, सुशिक्षित, समाजात मान-सन्मान असलेले, आपल्या कर्तृत्वाने, कार्याने श्रेष्ठ असलेले, उच्चपदस्थ महिला- पुरुष सुद्धा अशा अनैतिक बेकायदेशीर नातेसंबंधामधून स्वतःच वैवाहिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक आयुष्य बिघडवून घेताना दिसतात. समाजातील एकल महिला अशा स्वरूपाच्या अनैतिक आणि बेकायदेशीर रिलेशनशिपला फार पटकन बळी पडताना दिसतात. तरुण वयात आलेलं वैधव्य, कमी वयात झालेले घटस्फोट, त्यातच मुलांची पडलेली जबाबदारी, उत्पन्नाचं माध्यम उपलब्ध नसणे, नातेवाईक, घरातील इतर लोकांचा मानसिक, भावनिक आधार नसणे, पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी जबाबदार जवळची हक्काची व्यक्ती नसणे. त्यामुळे एकल महिला, विवाहित पुरुषांना सहजासहजी उपलब्ध होतात, त्यांच्याशी जोडल्या जातात आणि स्वतःच्या आयुष्याला नकळत चुकीच्या दिशेने घेऊन जातात.
समाजात आजही पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे विवाहित पुरुष स्वतःच्या कुटुंबाला, घराला, पत्नीला, मुलांना योग्य ते स्थान, योग्य ते सर्व कायदेशीर अधिकार देऊन, स्वतःची बाजू सांभाळून अशा एकल, एकट्या महिलांनादेखील बेकायदेशीर पद्धतीने आधार देताना दिसतात. आपल्या घरात अशा निराधार महिलांना ठेऊन घेण्यापासून ते त्यांची स्वतंत्र वेगळी व्यवस्था करून त्यांना पोसणे, त्यांची सर्व प्रकारची जबाबदारी घेणे, त्यांना समाजात पत्नीचा दर्जा देण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी विविध क्लृप्त्या वापरणे यात अशा महिला आणि पुरुषसुद्धा सक्रिय असतात, हे आपल्या कमकुवत होत चाललेल्या कुटुंब आणि सामाजिक व्यवस्थेचे परिणाम आहेत. अशा प्रकरणात महिलादेखील हे लक्षात घेत नाहीत की, सदर पुरुषाच्या आयुष्यात आपला कायदेशीर दर्जा, आपलं अस्तित्व काय आहे? आपलं नातं कोणत्या आधारावर कुठपर्यंत टिकणार आहे? आपल्या नात्याला कोणताही नैतिक, सामाजिक आधार आहे का? केवळ तात्पुरता मिळणारा आधार, प्रेम, आर्थिक फायदा पाहून महिला अशा नात्यांच्या अधीन गेलेल्या दिसतात. आपली समाजात बदनामी होईल, आपली मुलं आपल्याबद्दल काय विचार करतील, अथवा आपल्याला उतारवयात या गोष्टीमुळे किती पच्छाताप होईल, याचा थोडाही विचार महिलांनी केलेला दिसत नाही.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या नावाखाली, प्रेम, सोबत, साथ, आपुलकी, जिव्हाळा, इन्व्हॉलमेंट, आधार यांसारख्या गोंडस शब्दांचा सहारा घेऊन आणि आणाभाका घेऊन, वचन देऊन परपुरुष अथवा पर स्त्रीसोबत राहणे हा व्यभिचार खुलेआम समाजात सुरू असल्याचे दिसते. पहिल्या पती अथवा पहिल्या पत्नीपासून कायदेशीर घटस्फोट झालेला नसताना कोणीही दुसरं लग्न करून एकमेकांना द्वितीय पत्नी अथवा द्वितीय पती हा दर्जा देऊ शकत नाही, असे आपला हिंदू विवाह कायदा स्पष्टपणे सांगतोय. कोणत्याही स्त्री- पुरुषाचा कायदेशीर विवाह झालेला असताना, तो विवाह संपुष्टात आलेला नसताना देखील परक्या स्त्री अथवा पुरुषासोबत राहणे नीतिमत्ता, मूल्य, समाजरचना तसेच कायद्याला देखील धरून नाही, हे अनेकांना माहिती नाही, अथवा माहिती असूनसुद्धा त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून असे संबंध जोपासले जातात, हे समाजाचे आणि कुटुंब व्यवस्थेचे दुर्दैव असल्याचे लक्षात येते.
आपल्या आयुष्याला आधार मिळावा, आकार मिळावा, आपल्याला हक्काचा जोडीदार असावा ही अपेक्षा कोणत्याही स्त्री-पुरुषाला असणं अजिबात वावगं नाही. केवळ भावनेच्या आहारी जावून, आपल्या खोट्या चुकीच्या नात्याला आपण एखाद्या विवाहित पुरुषाची दुसरी पत्नीच आहोत, या गैरसमजात राहून अनेक महिला स्वतःची फसवणूक करून घेताना दिसतात. अनेक तडजोडी करून विवाहित पुरुषाच्या आयुष्यात दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळवण्यासाठी चुकीच्या, खोट्या, तात्पुरत्या आणि असुरक्षित नात्यात अडकून आपलं आयुष्य दिशाहीन करण्यापेक्षा वेळीच योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. जो स्त्री अथवा पुरुष विवाहित आहे, ज्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, त्याने दुसऱ्या निराधार स्त्री अथवा पुरुषाला प्रेमाच्या नावाखाली आपल्या आयुष्यात जागा देणे, स्वतःसोबत स्वतःचा लग्नाचा जोडीदार, कुटुंब, मुलं यांना अडचणीत आणणे, त्यांच्यावर अन्याय करणे, त्यांना आपले अनैतिक संबंध स्वीकारायला भाग पाडणे निश्चितच कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही.
बहुतांश ठिकाणी असे अनैतिक संबंध असलेल्या स्त्री-पुरुषांचा अभ्यास केला असता हे लक्षात येते की, एकमेकांना त्यांनी आपल्या कायदेशीर अस्तित्वात असलेल्या विवाहाची माहिती लपवून ठेवलेली असते. अनेकदा समोरच्याला आपण विवाहित आहोत, हे सांगितलेलं असेल तरी देखील आपली पत्नी अथवा पती आपल्यापासून लांब राहतो, अनेक वर्षे आम्ही विभक्त आहोत, आमच्यात मतभेद आहेत, आमचं पटत नाही, पत्नी नांदत नाही, आमचं एकमेकांवर प्रेम नाही, कोर्टात फारकतीची केस सुरू आहे, लवकरच घटस्फोट होणार आहे, मुलांसाठी तडजोड केली आहे, त्यामुळे घटस्फोट घेऊ शकत नाही, अधिकृत जोडीदार मुद्दाम घटस्फोट देत नाही, माझ्या पती अथवा पत्नीचं पण दुसरं अफेअर आहे, माझ्या सासरचे लोक चांगले नाहीत अशी कारणे देऊन समोरील व्यक्तीला आपलं अनधिकृत नातंच कसं योग्य आहे, हे पटवून दिलेलं असते. माझ्या पहिल्या पत्नीला अथवा पतीला आपलं हे नातं मान्य आहे, तिने त्याने हे स्वीकारलं आहे, ती किंवा तो कोणतेही कायदेशीर पाऊल आपल्या विरोधात उचलणार नाही, असा फाजील आत्मविश्वास अशा प्रकारे राहणाऱ्या पुरुषांना तसेच महिलांना असल्याचे दिसते.
त्यामुळे प्रत्येक स्त्रीने, पुरुषाने विशेषकरून एकल महिलांनी असे संबंध प्रस्तापित करण्याआधी सर्व कायदेशीर बाबी पडताळून घेणे, आपण कुठेही केवळ कोणाच्या भावनिक बोलण्यात येणार नाही, याची काळजी घेणे, कोणी आपल्या एकटेपणाचा गैरफायदा घेणार नाही, यासाठी सतर्क राहणे, आपल्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही, आपल्या मुलांचं भवितव्य धोक्यात येणार नाही, आपल्यामुळे कोणाचा संसार उद्ध्वस्त होणार नाही याचा पूर्ण विचार करणे आवश्यक आहे.
[email protected]